मुंबईतील पश्चिम उपनगरातील नालेसफाईचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या एकूण सफाईच्या ७६ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. यंदा नालेसफाईचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेची टिम रस्त्यावर उतरली असली, तरी पावसाळ्यात पाणी तुंबल्यास त्याची जबाबदारीही हा पक्ष घेणार का, असा सवाल आता विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.
फेब्रुवारी २०२१ पासून नालेसफाईच्या कामाला प्रारंभ!
पश्चिम उपनगरातील काही नालेसफाईच्या कामांची पाहणी महापौरांनी सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्षांसह केली. यावेळी बोलतांना त्यांनी २२ फेब्रुवारी २०२१ पासून नालेसफाईच्या कामाला प्रारंभ करण्यात आला असल्याचे सांगितले. कोरोनाच्या काळामध्येही नालेसफाईच्या कामांमध्ये कुठल्याही प्रकारे खंड न पडता नालेसफाईचे काम जोरात सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईतील नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये, यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या. यापूर्वी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दोन ते तीन दिवस पाण्याचा निचरा होत नव्हता, सद्यस्थितीत उदंचन केंद्राच्या कामामुळे पाण्याचा निचरा हा दोन ते तीन तासांत होत असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच दहिसर येथील दहिसर नदीवर पुलाच्या कामासाठी बांधण्यात आलेली बँड वॉल काढून टाकण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. ज्यामुळे दहिसर गावठाणचा परिसर जलमय होणार नाही, यादृष्टीने काम पूर्ण करण्याचे निर्देशही महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिले.
(हेही वाचा : मराठा आरक्षण निकालाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन… हे आहेत समितीतील सदस्य)
हिंदमाताच्या स्टोरेज टँकचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे
कोरोनाचे संकट जरी असले तरी मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत. नालेसफाईच्या संपूर्ण कामावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष असून त्यादृष्टीने ते वेळोवेळी नालेसफाई कामांचा आढावा ते घेत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील मोठे व छोटे नाले यांची सफाई मोहीम वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. हिंदमाता येथील पाणी साचण्याची समस्या लक्षात घेता, याठिकाणी स्टोरेज टँक बनविण्यात येणार असून यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समिती बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त दिलासा कसा देता येईल, याचा प्रयत्न या सर्व कामातून असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळ्यात पाणी तुंबल्याची जबाबदारी घ्यावी!
महापौरांनी केलेल्या ७२ टक्के नालेसफाईच्या दाव्यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हे मोजमाप महापौरांनी काय हातात मोजपट्टी लावून घेतले काय असा सवाल केला आहे. जर आपण नालेसफाईची पाहणी करून आम्ही करून दाखवले म्हणणाऱ्यांनी भविष्यात पावसाळ्यात पाणी तुंबल्यावरही याची जबाबदारी आपल्यावर घेण्याची तयारी दाखवावी, अशा शब्दांत समाचार घेतला. याप्रसंगी आमदार विलास पोतनीस , सुधार समिती अध्यक्ष सदानंद (सदा) परब, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प ) पी. वेलरासू, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) स्वप्निल टेंबवलकर , नगरसेविका रोहिणी कांबळे, शीतल म्हात्रे, सुजाता पाटेकर, उपायुक्त (परिमंडळ- ३) पराग मसुरकर, उपायुक्त (परिमंडळ -७ ) विश्वास शंकरवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा ) अनंत कदम, एच/ पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे, एच/ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, के/ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, पी/ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे, आर/ मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, आर /उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता (प.ज.वा.) व्यंकटेश कमलापुरकर तसेच संबंधित विभागाचे अधिकार उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community