सचिन वाझेची पोलिस दलातून हकालपट्टी! मुंबई पोलिस आयुक्तांचे आदेश

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी सचिन वाझे याच्या बडतर्फीचे आदेश जारी केले आहेत.

160

मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण, तसेच मनसुख हिरेन हत्या या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याची पोलिस खात्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सचिन वाझे याच्या बडतर्फीचे आदेश मंगळवारी जारी केले. सचिन वाझे याच्यावर खून, कट रचणे, दहशतवादी कृत्य करणे, धमकी देणे, पुरावे नष्ट करणे यांसारखे गंभीर आरोप असून, सध्या वाझे हा तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे.

सरकारी यंत्रणेचा वाझेने केला गैरवापर

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २५ फेब्रुवारी रोजी जिलेटीन स्टिक आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. त्यानंतर स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन याची ४ मार्च रोजी हत्या घडवून आणल्या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)ने अटक केली होती. या प्रकरणी सचिन वाझे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन स्फोटकांनी भरलेली कार ठेवून दहशतवादी कृत्ये करणे, धमकी देणे, कट रचणे, पुरावे नष्ट करणे, हत्या, बनावट दस्तऐवज तयार करणे यासारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. ही सर्व कृत्ये सचिन वाझे याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत असताना केली होती. त्यात त्याने सरकारी यंत्रणेचा वापर केला आहे. या सर्व प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर सचिन वाझे याची विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. एनआयने वाझेला अटक केल्यानंतर २४ तासांनी त्याला पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. निलंबनाचे आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्त(विशेष शाखा) यांनी काढले होते.

(हेही वाचाः सचिन वाझेला गुन्हे शाखेत घेण्यासाठी परमबीर सिंग आग्रही! नगराळे यांच्या अहवालात गौप्यस्फोट)

असा आहे वाझेचा इतिहास

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी सचिन वाझे याच्या बडतर्फीचे आदेश जारी केले आहेत. भारतीय संविधान कलम-३११ (२) (ब ) तरतुदीनुसार मंगळवारी सचिन वाझे याला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले असल्याचे आदेश जारी केले आहेत. सचिन वाझे हा १९९० साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात रुजू झाला होता. २००३ मध्ये त्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली होती. मात्र संशयित दशतवादी ख्वाजा युनूस प्रकणात निलंबित करण्यात आलेला सचिन वाझे १६ वर्षे पोलिस खात्यातून बाहेर राहिल्यानंतर, त्याला १० महिन्यांपूर्वीच पोलिस दलात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याकडे मुंबई गुन्हे शाखेची सीआययू प्रमुख म्हणून जवाबदारी देण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.