Ind vs Eng 5th Test : धरमशालात ५ बळी मिळवणाऱ्या कुलदीपने बुमरालाही टाकलं मागे

२०१७ मध्ये कुलदीपने धरमशाला इथंच कसोटी पदार्पण केलं होतं.

166
Ind vs Eng 5th Test : धरमशालात ५ बळी मिळवणाऱ्या कुलदीपने बुमरालाही टाकलं मागे
  • ऋजुता लुकतुके

डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवसाठी धरमशाला मैदान यशदायी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. २०१७ मध्ये पदार्पणाची कसोटी कुलदीप याच मैदानावर खेळला होता. तेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने ४ बळी टिपले होते. आणि आता इंग्लंड विरुद्धही त्याने ६८ धावांत ५ गडी बाद करण्याची कामगिरी केली. ही कामगिरी करताना त्याने काही विक्रमांनाही गवसणी घातली आहे. (Ind vs Eng 5th Test)

धरमशालात कुलदीपला त्याच्या पहिल्याच षटकात पहिलं यश मिळालं. डावखुरा सलामीवीर बेन डकेटला कुलदीपने त्या षटकात वारंवार चकवलं होतं. आणि अखेर चौथ्या चेंडूवर त्याचा फसलेला फटका शुभमन गिलने २० यार्ड मागे धावत जात छान पकडला. त्यानंतर जेवणाची सुटी होण्यापूर्वीच्या शेवटच्या षटकांत कुलदीपने ऑली पोपलाही बेमालूम चकवलं. त्याला पुढे येण्यासाठी उद्युक्त केलं. आणि मागे यष्टीरक्षक जुरेलने यष्ट्या उध्वस्त केल्या. (Ind vs Eng 5th Test)

पण, सगळ्यात मोलाचा बळी होता तो इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सचा. त्याला कुलदीपने यष्ट्यांसमोर पायचीत पकडलं. हा बळी त्याचा डावातील पाचवा बळी होता. कुलदीपने डावात ५ बळी टिपण्याची कामगिरी चौथ्यांदा केली. आणि त्याचबरोबर सगळ्यांत कमी चेंडूंमध्ये ५० कसोटी बळी टिपण्याच्या बाबतीत त्याने जसप्रीत बुमरा आणि अक्षर पटेलला मागे टाकलं. (Ind vs Eng 5th Test)

(हेही वाचा – Women’s Day 2024 : का साजरा केला जातो जागतिक महिला दिन)

कुलदीपने आता एकूण १२ कसोटींमध्ये ५१ बळी घेतले

कुलदीपने १,८७१ चेंडूंमध्ये ५० बळींचा टप्पा पार केला आहे. तर या कामगिरीसाठी अक्षरने २२०५ आणि बुमराने २५२० चेंडू घेतले होते. इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हा टप्पा सर करणारा तो फक्त तिसरा डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पॉल ॲडम्स (१३४) आणि इंग्लंडचा जॉनी वॉर्डल (१०२) यांनीच कसोटीत ५० च्या वर बळी टिपले आहेत. (Ind vs Eng 5th Test)

कुलदीपने आता एकूण १२ कसोटींमध्ये ५१ बळी घेतले आहेत. आणि यात त्याची सरासरी २१.८२ अशी प्रभावी आहे. डावात पाच बळी घेण्याची किमया त्याने चारदा केली आहे. तर ४० धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १०३ सामन्यांत १६८ बळी जमा आहेत. या मालिकेत कुलदीपने फलंदाजीतही आपली चमक दाखवली आहे. (Ind vs Eng 5th Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.