धक्कादायक! माओवाद्यांचा ७०० शाळकरी मुलांसाठी ट्रेनिंग कॅम्प! 

एका बाजूला नक्षलवाद्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. त्याठिकाणी कोरोनासंबंधी नियमांचे पालन केले जात नाही, सोशल डिस्टन्स ठेवला जात नाही, अशा वेळी या ७०० मुलांचा ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणे हे या मुलांचा जीवितासाठी धोक्याचे आहे,  त्यामुळे यावर पोलिस लक्ष ठेवून असल्याचे समजते. 

199

सध्या जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः मृत्यूचे तांडव सुरु आहे. त्यामुळे देशातील ज्या ज्या जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे, त्या त्या भागांत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे छत्तीसगड राज्यातही काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. असे असतानाही या भागातील सुमारे ७०० शाळकरी मुलांना घेऊन सीपीआय-माओवादी यांनी ट्रेनिंग कॅम्प सुरु केला आहे, त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण बनले आहे.

कोरोनाचा फायदा घेऊन ट्रेनिंग कॅम्प!

सध्या या भागात कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तरीही माओवाद्यांनी येथील १२ ते १८ वयोगटातील तब्बल ७०० शाळकरी मुलांची भरती केली असून छत्तीसगडमधील अबुझमड या भागात महिनाभरासाठी या मुलांचा ट्रेनिंग कॅम्प सुरु केला आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे माजी संचालक प्रकाश सिंग यांनी ट्विटद्वारे ही धक्कादायक माहिती दिली आहे. या संबंधीचे वृत्त सिर्फसच डॉट इन या संकेतस्थळावरही देण्यात आले आहे. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. अशा वेळी घरात बसून असलेल्या शाळकरी मुलांना नक्षली चळवळीत सामावून घेण्यासाठी त्यांचे माओवाद्यांनी संघटन निर्माण केले आहे, असे या संकेतस्थळाच्या बातमीत म्हटले आहे. आम्ही यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

छत्तीसगडमधील नक्षल दलम भागात कोरोनाचा फैलाव! 

छत्तीसगड पोलिसांनी या भागात नक्षलवाद्यांच्या प्रमुखांसह ५० नक्षलवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असा दावा केला आहे. ज्यामध्ये दंडकारण्य स्पेशल झोन कमिटी मेंबर सुजाता हिचाही समावेश आहे. तिच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये रामण्णा याचा मृत्यू झाल्यानंतर सुजाता हिला अघोषित छत्तीसगडमधील माओवाद्यांची प्रमुख म्हणून ओळखली जाऊ लागली आहे, आता सुजाताला कोरोना संसर्गामुळे श्वसनाचा त्रास होऊ लागला असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

(हेही वाचा : एसआरपीएफ जवानांच्या बदलीचा कालावधी बदलला!)

नक्षलवाद्यांचे पुढील पाऊल काय असणार? 

दरम्यान जर छत्तीसगड येथील नक्षल दलम भागात कोरोनाचा संसर्ग फैलावला असेल तर यातून बाहेर पाडण्यासाठी नक्षलवादी  नक्की हालचाल करणार. हा संसर्गजन्य आजार असल्याने याला थोपवण्यासाठी नक्षलवादी ताबडतोब प्रयत्न करतील, त्याकरता ते शहरी भागात येऊन रुग्णालयांत उपचार घेतील, म्हणून पोलिस सतर्क झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या कोरोनावरील रेमडेसिवीर आणि अन्य औषधांचा तुटवडा आहे, त्यामुळे नक्षलवाद्यांकडे जरी वैद्यकीय सेवा पुरवण्याची सुविधा जंगलात असली, तरी या आजारासाठी लागणाऱ्या औषधांची व्यवस्था ते कशी करतात हे पाहावे लागेल, यासाठी पोलिस आता शहरी नक्षलवाद्यांच्याही हालचालींकडे बारीक नजर ठेवून आहेत, असेही सूत्रांकडून समजते.

मुलांचा ‘तो’ ट्रेनिंग कॅम्पही धोक्याचा! 

सध्या सीपीआय-माओवादी यांनी ७०० शाळकरी मुलांची भरती करून त्यांचा ट्रेनिंग कॅम्प सुरु केला आहे. एका बाजूला नक्षलवाद्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. त्याठिकाणी कोरोनासंबंधी नियमांचे पालन केले जात नाही, सोशल डिस्टन्स ठेवला जात नाही, अशा वेळी या ७०० मुलांचा ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणे हे या मुलांचा जीवितासाठी धोक्याचे आहे,  त्यामुळे यावरही पोलिस लक्ष ठेवून असल्याचे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.