बोरीवली पूर्व येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मुंबई महापालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. हे रुग्णालय ११ मजल्यांचे असून सध्या १०५ खाटांची क्षमता आहे. पण लवकरच हे रुग्णालय १५० खाटांचे केले जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या विभागाव्यतिरिक्त याठिकाणी नव्याने नेत्ररोग विभाग, कान-नाक-घसा विभाग, अतिदक्षता विभाग, नवजात शिशू विभाग, अपघात विभाग या सर्व प्रकारच्या सुविधा रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत.
महापौरांच्या हस्ते अनावरण
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण झाले. तत्पूर्वी महापौरांच्या हस्ते नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे महापौरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी आमदार विलास पोतनीस, आर/मध्य व आर/उत्तर विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, स्थानिक नगरसेवक विद्यार्थी सिंह, उप आयुक्त (परिमंडळ -७) विश्वास शंकरवार, आर/मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप जाधव, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पहुरकर आदी उपस्थित होते.
(हेही वाचाः …म्हणून मुंबईतील लस जातात परत)
जागतिक परिचारिका दिनाच्या महापौरांनी दिल्या शुभेच्छा
संपूर्ण देशभरात कोरोना नियंत्रणाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी ज्या ‘मुंबई मॉडेलचा’ आज गौरव होत आहे, त्या गौरवामध्ये परिचारिकांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. १२ मे हा फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालयाच्या परिचारिका वसतीगृहात मंगळवारी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी परिचारिकांना संबोधित करताना महापौर बोलत होत्या. याप्रसंगी आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, नगरसेवक मंगेश सातमकर, लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, डॉ. इंगळे तसेच परिचारिका उपस्थित होत्या.
Join Our WhatsApp Community