आज झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यामध्ये राज्यातील १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे त्यांनी सांगितले. सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचे लसीकऱण करणे गरजेचे असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात य़ेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यासंबंधीचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने मंगळवारी, ११ मे रोजी दिले होते.
आता ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य!
जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही, तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे त्यांनी सांगितले. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करु नये, असेही त्यांनी सांगितले. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा : १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरण मोहिमेला लागणार ब्रेक?)
४५ वर्षांवरील ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या(कोवॅक्सिन) प्रतिक्षेत!
याचे सूतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधीच दिले होते. राज्यात आतापर्यंत सुमारे १ कोटी ८४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत मोफत लसीकरण केले जाते. सध्या राज्यात कोवॅक्सिन लसींचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत आणि ४५ वर्षांवरील सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या(कोवॅक्सिन) प्रतिक्षेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांसाठी हे डोस पुरेसे नाही. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिनचे २ लाख ७५ हजार डोसेस आणि शिल्लक ३५ हजार डोसेस असे एकूण सुमारे ३ लाख डोसेस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. कोविशिल्डचे देखील दुसरे डोस सुमारे १६ लाख नागरिकांना द्यायचे आहेत. महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस, केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने सध्यातरी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त काही दिवसांसाठी कमी करण्याबाबत राज्य टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी, ११ मे रोजी सांगितले होते.
Join Our WhatsApp Community