सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढलेली रुग्ण संख्या आता नियंत्रणात येऊ लागली आहे. लॉकडाऊनमुळे हे शक्य झाले असल्याचे बुधवारी, ११ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचा सूर होता. त्यामुळे राज्यात सध्या सुरु असलेला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यावर मंत्रिमंडळाचे एकमत झाले आहे. याची घोषणा मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ दिवसांत करणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
येत्या दोन दिवसांत नियमावली जाहीर होणार
राज्यातील लॉकडाऊनमुळे रुग्ण वाढीचे प्रमाण घटले आहे. लोकलमध्ये सवलत मिळण्याची शक्यता कमीच आहे, सध्या जे कडक निर्बंध लागू आहेत, तेच ३१ मेपर्यंत कायम राहतील, पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
(हेही वाचा : अखेर १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरण मोहिमेला स्थगिती! )
ग्रामीण भागातील रुग्ण वाढीने सरकारची वाढवली चिंता
मुंबई सारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होताना पहायला मिळत आहे. पण असे असताना ग्रामीण भागातील वाढणारी रुग्णसंख्या मात्र सरकारची डोकेदुखी ठरत आहे. आज राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी फक्त १२ जिल्ह्यांमध्ये रिकव्हरी रेट कमी होत आहे. इतर जिल्ह्यांत मात्र अजूनही परिस्थिती जैसे थे असल्याने, आता काही जिल्ह्यामंध्ये स्थानिक प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण त्यालाही हवा तसा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत नाही. त्याचमुळे जर ग्रामीण भागातील ही कोरोनाची साखळी तोडायची असेल, तर आणखी काही दिवस तरी संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन लावावाच लागेल, असे काही जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community