- नमिता वारणकर
गणेश दामोदर सावरकर उपाख्य बाबाराव सावरकर! (Babarao Savarkar) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांचे नाव गणेश असले, तरी ते ‘बाबाराव’ या नावाने ओळखले जात असत. स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे, अध्यात्माची ओढ असलेले, योगी झालो, तर मोक्ष मिळेल, पण मग देशाचे काय होईल, या विचाराने स्वत:ला क्रांतिकार्यात झोकून देणारे… देशातल्या बहुसंख्य क्रांतिकारकाच्या संपर्कात राहणारे… वीर सावरकर लंडनला गेल्यावर अभिनव भारत संघटनेची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारे… हिंदू राष्ट्रवादाचे समर्थक, ११ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे, महान क्रांतिकारक… द. न. गोखले यांनी लिहिलेल्या ‘क्रांतिवीर बाबाराव सावरकर’ (Babarao Savarkar) या चरित्रात त्यांची ओळख करून देताना ‘बाबारावांचे जीवन म्हणजे रत्नांची खाणच्या खाण’ असे म्हटले आहे.
बाबारावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी १३ जून १८७९ला चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. सुरुवातीच्या शिक्षणादरम्यान बाबारावांचे मन अभ्यासाव्यतिरिक्त धर्म, योग आणि नामस्मरणात रमले. तरुण वयात कडक थंडीतदेखील ते उघड्या अंगाने, पांघरूण न घेता घराबाहेर झोपत. त्यांच्या डोक्यात क्रांतीचेच विचार सतत घोळत असत. बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुरू केलेल्या अभिनव भारत याची धुरा त्यांनी सांभाळली तसेच त्यांनी थोर पुरुषांची जयंती जाहीर सभा घेऊन साजरी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणांमध्ये आणि जनतेत देशभक्ती जागृत होण्यास खूपच मदत झाली.
पितृतुल्य प्रेम !
वडील प्लेगच्या साथीने मरण पावले. आई राधाबाई यांचाही वडील जाण्याच्या सात वर्षे आधी प्लेगच्या साथीतच मृत्यू झाला होता. त्यामुळे घरात थोरला भाऊ असल्यामुळे इतर दोन भाऊ-बहिणीचा सांभाळ करण्याची जबाबदीर बाबारावांवर आली होती. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पितृतुल्य प्रेम दिले. अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतिकार्यातही भाग घेतला.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ)
संघटनचातुर्य आणि अन्यायाचा प्रतिकार
अंदमानातील ‘सेल्युलर जेल’ मध्ये असताना बाबारावांच्या शारीरिक यातनांना पारावार राहिला नाही. धोकादायक क्रांतीकारक म्हणून तेथील तुरुंगाधिकाऱ्याने बाबारावांकडून अतिशय कष्टाची कामे करवून घेतली. तरीही बाबारावांच्या मनातील क्रांतीची भावना यत्किंचितही कमी न होता ती अधिकच धारदार झाली. संघटनचातुर्य आणि अन्यायाचा प्रतिकार हे गुण त्यांच्या रोमारोमांत भिनले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबाराव दोघांनी मिळून अंदमानातच कारावास भोगला. त्यांनी कारागृहातील राजकीय कैद्यांना संघटित केले. चांगली वागणूक आणि अन्न मिळावे म्हणून उपोषण, असहकार, संप या मार्गांनी लढा दिला. २७ सप्टेंबर १९०६ रोजी दसऱ्यानिमित्त नाशिक येथील कालिकेच्या मंदिराकडून सीमोल्लंघन करून परतणाऱ्या तरुणांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला. तो ऐकून एका पोलिसाने बोंब मारणे बंद करा’, असे म्हणत बाबांच्या अंगावर हात टाकला. मात्र बाबांसकट सर्वांनीच त्या पोलिसाला ठोकून काढले! या प्रसंगाने संतप्त झालेल्या ब्रिटीश सरकारने ११ तरुणांवर अभियोग भरला. `वंदे मातरम् अभियोग’ या नावाने तो गाजला. या अभियोगामुळे ते ब्रिटिशांच्या नजरेत आले. (Babarao Savarkar)
अंतिम श्वासापर्यंत संघकार्य
स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला गेल्यावर अभिनव भारत संघटनेची संपूर्ण जबाबदारी बाबारावांनी आपल्या खांद्यावर घेतली. जन्मठेपेची शिक्षा होऊन वीर सावरकरांपूर्वीच ते अंदमानात पोहोचले होते. तेथे त्यांचा अपरिमित छळ करण्यात आला. अंदमानातून ते सुटले तेव्हा मरणासन्न अवस्थेतच होते. तरीही सुटकेनंतर त्यांनी स्वतःला पुन्हा क्रांतिकार्यात झोकून दिले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद, हुतात्मा राजगुरू अशा देशातल्या बहुसंख्य क्रांतिकारकांच्या ते संपर्कात होते. एम्पायर सिनेमा बॉम्ब केस प्रकरणात बाबारावांना अटक करून ४ वर्षे नाशिकला स्थानबद्ध करून ठेवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उभारणीतही बाबारावांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी स्वतःची तरूण हिंदुसभा संघात विलीन केलीच पण घरोघरी जाऊन संघासाठी निधी गोळा केला. (Babarao Savarkar)
(हेही वाचा – EV Policy : भारताला ई-वाहनांचे उत्पादन केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी ई-वाहन धोरणाला मंजुरी)
वाचन, मनन, चिंतन आणि ग्रंथसंपदा
त्यांनी उदंड वाचले, उदंड चिंतिले, योग, तत्त्वज्ञान, धर्म, वैद्यक, इतिहास हे त्यांचे आवडते विषय. त्यावर क्षण क्षण साधून वाचावे. रात्री येरझारा घालीत कोठडीत विचार करावा, अशी त्यांनी कित्येक वर्षे कारागृहामध्ये घालवली. त्यांनी जे लिखाण केले त्या लिखाणाचे बीज अंदमानात आहे. अनेक वर्षे त्यांनी अंदमानात चिंतन मनन केले. यामुळे त्यांच्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारली आणि मनही उन्नत, उदात्त झाले. डोक्याचे अन्न अर्थात पुस्तके मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. बाबारावांनी अनेक पुस्तके लिहिली. `वीर बैरागी’ या भाई परमानंदलिखित पुस्तकाचे त्यांनी भाषांतर केले. या पुस्तकात बंदा वीराचे चरित्र सांगून हिंदूंना स्फूर्ती द्यावी, सूड कसा उगवावा ते शिकवावे तसेच पंजाबातील शीख आणि मराठे यांचा दुवा जोडावा, हा बाबारावांचा उद्देश होता. या पुस्तकात औरंगजेबाच्या मुसलमानी सत्तेशी वीर बंदा बैराग्याने केलेल्या संघर्षाची कहाणी आहे. `राष्ट्रमीमांसा’ या पुस्तकात त्यांनी भारत हे हिंदुराष्ट्र आहे’ हे सिद्ध केले आहे. `श्री शिवरायांची आग्र्यावरील गरुडझेप’ या पुस्तकात आग्र्याला जाण्यात शिवरायांचा हेतू औरंगजेबाचा वध करण्याचा होता, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. (Babarao Savarkar)
वंदन तुज मातृभूमि हे अखेरचे…
आयुष्यभर देशहितासाठी प्राणपणाने झटणाऱ्या बाबारावांनी १६ मार्च १९४५ला कृतज्ञ ह्रदयाने देशाचा निरोप घेतला. आपण आज स्वतंत्र झालो असलो तरी देशापुढे आव्हाने आहेत. या परिस्थितीला तोंड देऊन, आपल्या देशाला समर्थ आणि संपन्न बनविण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्यासाठी नवीन पिढीला बाबाराव सावरकरांचे चरित्र, त्यांच्या देशभक्तीच्या स्फुर्तीदायी कथा अभ्यासणे निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
(संदर्भ- क्रांतिवीर बाबाराव सावरकर – लेखक द.न. गोखले)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community