हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत मतदानाची परवानगी दिली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेदरम्यान मणिपूरशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, मणिपूरमध्ये मदत शिबिरात राहणाऱ्यांसाठी आम्ही एक योजना तयार केली आहे. कॅम्पमध्ये राहणाऱ्या मतदारांना कॅम्पमधूनच मतदान करण्याची परवानगी दिली जाईल. जशी जम्मू आणि काश्मीरमधील स्थलांतरितांसाठी एक योजना आहे. त्याच धर्तीवर ही योजना मणिपूरमध्ये लागू केली जाईल. मणिपूरच्या मतदारांना त्यांच्या छावणीतून मतदान करण्याची परवानगी दिली जाईल. मतदारांना माझे आवाहन आहे की, या, मतदानाद्वारे निर्णय घ्या आणि शांततेने निवडणुकीत सहभागी व्हा. आम्ही व्यवस्था करू अशी ग्वाही निवडणूक आयुक्तांनी दिली.
गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये मेईतेई आणि आदिवासी कुकी समुदायांमध्ये सुरू झालेल्या जातीय संघर्षात 200 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दलांनी 25 हजारांहून अधिक लोकांची सुटका केली आहे, तर सुमारे 50 हजार लोकांना छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community