Lok Sabha Election 2024: दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदार मार्गदर्शिका प्रकाशित

310
Lok Sabha Election 2024 : "काय करावे" व "काय करु नये" याबाबत काय म्हणते आदर्श आचारसंहिता

मतदार शिक्षण आणि समावेशकता या पैलूंना चालना देण्यासाठी, ईसीआय अर्थात भारतीय निवडणूक (Lok Sabha Election 2024) आयोगाने यावेळी प्रथमच एक अभिनव उपक्रम राबवला. आयोगाने बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सहयोगाने, भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघटना आणि दिल्ली तथा जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या दरम्यान एका प्रदर्शनीय क्रिकेट सामन्याचे आयोजन केले. नवी दिल्लीत कर्नेलसिंग स्टेडियमवर 16 मार्च 2024 या दिवशी हा सामना खेळविण्यात आला.

अर्जुन पुरस्कार विजेती आणि नाणावलेली दिव्यांग तिरंदाज शीतल देवी हिचे नाव यावेळी ‘दिव्यांग श्रेणीतील राष्ट्रीय आदर्श व्यक्तिमत्त्व (नॅशनल आयकॉन)’ म्हणून घोषित करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आली. विजेत्या संघाचे त्यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. सहभागी क्रिकेट संघटना -डीडीसीए आणि आयडीसीए यांच्या अधिकाऱ्यांसमवेत माजी क्रिकेटपटू निखिल चोप्रा यांनाही विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

वर्ष 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या पूर्वसंध्येला संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या टी20 अजिंक्यपद करंडकावर भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघटनेच्या संघाने नाव कोरले होते. स्पर्धा जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल या संघाचे कौतुक करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यावेळी दिलेल्या वचनाची पूर्तता 16 मार्चच्या या सामन्याने झाली आहे. “मुख्य प्रवाहातील क्रिकेट संघांबरोबर भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघटनेच्या संघाचा सामना प्रायोजित करण्याच्या शक्यतेवर भारतीय निवडणूक आयोग विचार करेल”, असे सूतोवाच त्यांनी त्यावेळी केले होते.

या सामन्यासाठी उपस्थित असलेल्या जवळपास अडीच हजार प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याजोगी कामगिरी दोन्ही संघांनी केली. या क्रीडारसिकांमध्ये विविध श्रेणीतील दिव्यांग आणि तरुण मतदार समाविष्ट होते. सर्वांनी स्वच्छ निळ्या आकाशाखाली सामन्याचा आनंद घेतला. या सामन्यात डीडीसीए संघाचा 69 धावांनी विजय झाला. (डीडीसीए – 190/5, आयडीसीए – 121/8). मात्र, समावेशकतेचा आणि संघटनशक्तीचा संदेश हाच या सामन्याचा खरा विजेता ठरला. संपूर्ण कार्यक्रमातून मतदानाचे महत्त्व विशद करणारा – ‘न दुजे काही श्रेष्ठ मतदानापरी, यास्तव मी निश्चित मतदान करी’ हा संदेश ठळकपणे बिंबवला गेला.

(हेही वाचा – Shiv Sena Video : ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत सत्तापिपासू उद्धव ठाकरेंचा शिवसेनेने केला जाहीर निषेध)

सर्वसमावेशकता आणि सक्षमता यांप्रती भारतीय निवडणूक आयोगाची वचनबद्धता यातून अधोरेखित होते. निवडणूक प्रक्रियेत नोंदणी करून घेऊन सहभागी होण्याची स्फूर्ती याद्वारे सोबतच्या दिव्यांग मतदार बंधुभगिनींना मिळू शकेल. दृष्टिबाधित कलाकारांच्या ‘द शायनिंग स्टार म्युझिक बॅंड’ या संगीतवृंदाने सादर केलेल्या रोमांचकारी सांगीतिक कार्यक्रमाने या सामन्याची सांगता झाली.

दिव्यांग मतदारांसाठी नियमावली..
या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान, आयोगाने दिव्यांग मतदार (पीडब्ल्यूडीएस) आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी एक समर्पित मतदार मार्गदर्शक नियमावली जारी केली. या सर्वसमावेशक नियमावलीमध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आवश्यक तरतुदींची रूपरेषा देण्यात आली आहे, मतदानाचा सहज आणि आनंददायी अनुभव देण्यासाठी या नियमावलीमध्ये मतदान केंद्रांवरील पायाभूत सुविधा, माहितीपूर्ण आणि प्रक्रिया संबंधी तपशील, तसेच टपाल मतपत्रिकांची व्यवहार्यता आणि कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात आली आहे. या पद्धती आयोगाने दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांचे अनुसरण करतात. यामध्ये इतर गोष्टींबरोबरच, 40% पेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी पर्यायी घरून मतदान सुविधा, दिव्यांग व्यक्तींचे मतदान केंद्रानुसार प्रमाण लक्षात घेत, मतदानाच्या दिवशी मोफत वाहतुकीची तरतूद, सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांगासाठीच्या-विशिष्ट सुविधा, मतदान केंद्रांवर सुगम्यता , राज्य आणि जिल्हा स्तरावर दिव्यांग आयकॉनची नियुक्ती, जागरूकता मोहिमा, भारतीय निवडणूक आयोगाच्या सक्षम ॲप बद्दलची माहिती, ब्रेल लिपी असलेले मतदार ओळखपत्र आणि ईव्हीएम मशीन बाबतची माहिती इत्यादी उपक्रमांचा यात समावेश आहे.

सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीत…
भारताच्या निवडणूक आयोगाला पूर्ण विश्वास आहे की, अशा उपक्रमांमुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत विशेषतः तरुण आणि दिव्यांग व्यक्तींचा मतदानातील सहभाग लक्षणीयरीत्या वाढेल. मार्गदर्शक तत्त्वे आणि सर्वसमावेशक उपायांच्या कार्यप्रणालीनुसार, निवडणूक आयोग प्रातिनिधिक आणि मजबूत लोकशाहीप्रति वचनबद्ध आहे. भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या (ISLRTC) विद्यार्थ्यांच्या सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.