Randeep Hooda : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमासाठी रणदीप हुड्डाने चक्क स्वत:चं घर विकलं !

266
Randeep Hooda: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमासाठी रणदीप हुड्डाने चक्क स्वत:चं घर विकलं !

एखादी वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती साकार करण्यासाठी कलाकाराची कोणत्याही प्रकारे मेहनत घ्यायची तयारी असते. त्याच्याकडील कौशल्याचा संपूर्ण क्षमतेने आपल्या कलेसाठी वापर कसा होईल, याकडेच त्याचे संपूर्ण लक्ष वेधलेले असते, त्यासाठी वेळप्रसंगी कोणत्याही गोष्टींचा त्याग करण्याची त्याची तयारी असते. हेच दाखवून दिले आहे; रणदीप हुड्डा (Randeep Hooda) या अभिनेत्याने.

अभिनेता रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा २२ मार्चला प्रदर्शित होत आहे. यामध्ये त्याने वीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाची बरीच चर्चा होत आहे. या चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्यानंतर रसिक प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहात आहेत. अभिनयासोबत चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनसुद्धा त्यानेच केले आहे. सध्या रणदीप हुड्डा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटादरम्यान त्याच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी त्याने चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगण्याबरोबरच एक महत्त्वाचं वक्तव्य केलं असून प्रश्न विचारणाऱ्या मुलाखतकाराला सडेतोड उत्तरही दिलं आहे.

सिनेमासाठी घर विकलं
मुलाखतीदरम्यान अभिनेता रणदीप हुड्डाला सरकारच्या पाठिंब्यामुळे अशा प्रकारची विचारधारा असलेले चित्रपट प्रदर्शित होत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला? या प्रश्नाला उत्तर देताना रणदीप हुड्डा म्हणाला की, ‘कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है कहना.’ हा चित्रपट करण्यामागील वास्तव मला ठाऊक आहे. हा चित्रपट वीर सावरकर यांच्यावर झालेला अन्याय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये मला कुणीही मदत केलेली नाही. मी माझं घरदार विकून हा चित्रपट केला आहे. तुम्ही कोणत्या प्रपोगंडाविषयी बोलत आहात? प्रपोगंडा चित्रपटासाठी एक-दीड वर्ष कोण मेहनत करतं? मी या सिनेमासाठी काय केलं आहे, ते मला माहित आहे, पण लोकं काहीही विचार करू शकतात.

प्रश्न विचारणं हे लोकांचं काम
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ताणतणावांना सामोर जावे लागेल असे वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना त्याने सांगितले की, माझ्या हितचिंतकांनी मला हा चित्रपट करू नका, असे सांगितले होते. तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असाल. कलाकाराने तटस्थ राहिले पाहिजे. असो, प्रश्न विचारणं हे लोकांचं काम आहे. मला त्याची पर्वा नाही. वीर सावरकरांच्या विरोधात सुरू असलेला खोटा प्रचार मोडून काढणारा हा चित्रपट आहे.

(हेही वाचा – Mahayuti बेबनाव, BJP कडून ऐनवेळी उमेदवार बदलण्याची शक्यता )

सशस्त्र क्रांतीवर बोलणारा चित्रपट…
मी अत्यंत जिद्दी आहे. इतिहासाचा विद्यार्थी आहे. ‘काळे पाणी’ या पुस्तकाव्यतिरिक्त मी वीर सावरकरांविषयी काहीही वाचले नव्हते. शालेय पुस्तकांमध्येही सशस्त्र क्रांतीचा एकच परिच्छेद आहे. मग मी त्यांच्याविषयी हिंदी, इंग्रजी आणि मराठीत लिहिलेली पुस्तके वाचली. मी इतकं वाचलं होतं की मीच चित्रपट लिहिला आहे. त्यानंतर दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. माझा हा चित्रपट सशस्त्र क्रांतीवर बोलणार आहे. मी तारखेनुसार कथेची मांडणी केली आहे. देवाच्याही हातात शस्त्रे आहेत. हिंसा करणे चुकीचे आहे, पण स्वसंरक्षणासाठीही स्वतःचा बचाव केला नाही तर कसे चालेल? यावर चर्चा व्हायला हवी असे मला वाटले, असेही त्याने सांगितले.

सत्य लोकांसमोर आणण्यासाठी…
निवडणुकीच्या वातावरणात तुम्ही चित्रपट घेऊन येत आहात. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाला ‘प्रपोगंडा फिल्म’ म्हटलं जातं. याबद्दल काय सांगशील? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी ANIच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर रणदीप हुड्डा म्हणाला की, हा ‘अँटी-प्रपोगंडा’ चित्रपट आहे. सावरकरांविरोधात अनेक वर्षांपासून चालवलेला प्रपोगंडा, त्यांच्याबद्दल बोलण्यात आलेले वेगवेगळे शब्द त्या सर्वांचा भांडाफोड करण्यासाठी आणि सत्य लोकांसमोर आणण्यासाठी हा चित्रपट आहे. ज्या पक्षाशी लोक हा चित्रपट जोडत आहेत त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी माझ्या चित्रपटाची गरज नाही. निवडणुकीच्या वातावरणात हा चित्रपट येत आहे हे चांगले आहे.”

जनताच पुरस्काराची मागणी करेल…
वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. तुम्हाला काय वाटते? या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला की, मला वाटते की, मला या चित्रपटातून एक मोहीम चालवायची आहे. मला वाटते की, हा चित्रपट पाहिल्यानंतर सामान्य जनता त्यांच्यासाठी ‘भारतरत्न पुरस्कारा’ची मागणी करेल. ते मान्य करावेच लागेल.

अभिनय आणि राजकारण दोन्ही करू शकत नाही…
भविष्यात राजकारणात येण्याची इच्छा आहे का? यावर अभिनेता रणदीप हुड्डा म्हणाला की, ‘राजकारण’ हा एक असा व्यवसाय आहे जो हलक्यात घेता येत नाही. मी माझ्या अभिनय कौशल्याचा कधीही गैरफायदा घेतला नाही. एक कलाकार म्हणून मला खूप काम करायचे आहे. जर मी राजकारणात आलो, तर मी त्याकडे एक कारकीर्द म्हणून बघेन. मी दोन्ही करू शकत नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.