Dharavi redevelopment project : सर्वेला माटुंग्यातील कमला रामन नगरपासून सुरुवात

1275
धारावी विकास प्रकल्पाच्या (Dharavi redevelopment project) दृष्टीकोनातून आता पात्र आणि अपात्र कुटुंबांच्या सर्वेक्षणाला सोमवारी, १८ मार्च २०२४ पासून सुरु झाली असून ही सुरुवात माटुंगा रेल्वे स्थानकासमोरील कमला रामन नगरपासून करण्यात आली आहे. कमला रामन नगर परिसर हे धारावीचे टोक असून या भागापासून या सर्वेक्षणाल सुरुवात करत प्रत्येक घरांवर कोंडींग पध्दतीने क्रमांक टाकण्यात आले आहे. मात्र, हा सर्वे सुरु असतानाच धारावीतील काही गटाने कमला रामन नगरमधील रहिवाशांना हा सर्वे अनधिकृत असून त्यांना प्रतिसाद देऊ नका अशाप्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा प्रकल्प शासनाचा असून रेल्वेची ही जागा या विकास प्रकल्पासाठी अधिकृतपणे समाविष्ठ करण्यात आल्याने येथील रहिवाशांनी या सर्वेला चांगल्याप्रकारे प्रतिसाद दिला. त्यामुळे धारावी प्रकल्पासाठी आवश्यक असणारा सर्वे कमला रामन नगरपासून सुरु झाल्याने येथील रहिवाशांनी एकप्रकारे आनंद व्यक्त केला आहे.
आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या विकासाचा प्रकल्प (Dharavi redevelopment project) राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला असून यासाठी अदानी कंपनीची  निवड करण्यात आली आहे. या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत या भागातील कुटुंबांची पात्रता निश्चित करण्यासाठी अदानी कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या सर्वेक्षणाला सोमवार १८ मार्च २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस व्ही आर श्रीनिवास यांच्या उपस्थित या  सर्वेचा शुभारंभ  करण्यात आला. प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्वसन पात्रता निकष निश्चित करण्यासाठी राज्य सरकार या माहितीचा उपयोग करणार आहे. या सर्वेक्षणामुळे जगातील सर्वात मोठ्या अनौपचारिक वसाहतींपैकी एक असलेल्या धारावीवर प्रथमच ‘डिजिटल धारावी’ ही प्रगत लायब्ररी तयार होणार आहे.
माटुंगा रोड रेल्वे स्थानक समोरील रेल्वेच्या जागेवर वसलेल्या कमला रामन नगरमध्ये सुमारे ३५० ते ४०० झोपड्या आहेत.  या सर्व झोपड्या १९८० च्या पूर्वीपासून वसलेल्या असून रेल्वे प्रशासनाने या झोपड्यांना मान्यता देण्यास वारंवार नकार दिल्याने  या वस्तीचा समावेश धारावी  पुनर्विकास प्रकल्पात व्हावा यासाठी येथील रहिवाशांचा मोठा लढा सुरू होता. स्थानिक खासदार राहुल शेवाळे  यांच्या माध्यमातून येथील रहिवाशांनी ही मागणी केली होती. त्यानुसार रेल्वेला पैसे अदा करून या जमिनीची मालकी शासनाने आपल्या नावे करून या जमिनीवरील कुटुंबांना या प्रकल्पात समावेश केला. त्यामुळे या सर्वेला माटुंगा कमला रामन नगर येथून सुरूवात झाल्याने एक प्रकारचा आनंद येथील रहिवाशांच्या चेहऱ्यावर होता.
सर्वेक्षणाला कमला रामन नगर येथून प्रारंभ झाल्यानंतर दिवस भरात सुमारे २०० घरांवर  एक विशिष्ट क्रमांक म्हणून कोडींग नंबर  देण्यात आला आहे. हे कोडींग नंबर चे काम पूर्ण झाल्यावर संबंधित गल्लीचे  लेसर मॅपिंग करण्यात येईल, ज्याला ‘लिडार सर्व्हे’ म्हणून ओळखले जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर संबंधित कुटुंबाची कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी एक प्रशिक्षित टीम  विकसित केलेल्या ऍपसह प्रत्येक सदनिकेला भेट देणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्वसन पात्रता निकष निश्चित करण्यासाठी राज्य सरकार या माहितीचा उपयोग करणार आहे. या सर्वेक्षणामुळे जगातील सर्वात मोठ्या अनौपचारिक वसाहतींपैकी एक असलेल्या धारावीवर प्रथमच ‘डिजिटल धारावी’ ही प्रगत लायब्ररी तयार होणार आहे. धारावीकरांच्या प्रश्नांना आणि समस्यांना उत्तर देण्यासाठी टोल फ्री क्रमांक- 1800-268-8888 उपलब्ध  करून देण्यात  आला आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) आणि महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अधिकारी उपस्थित होते आणि यांनी प्रत्येक घरांवर विशिष्ठ प्रकारचे क्रमांक लिहिले आहेत. आमचा लढा हा मागील १४ ते १५ वर्षांपासून असून ही वस्ती धारावी विकास प्रकल्पात समाविष्ट होवून त्यानुसार प्रत्येक घरांचा सर्वे होत आहे, याचा आनंद आहे.यात एकही घर वगळले जाणार नसून  एक मजली झोपडी असल्यास तशी नोंदही केली जात आहे, त्यामुळे आज खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे काम सुरू झाल्याचे सांगत त्यांनी सर्वे  काम नियोजित आठ महिन्याच्या कालावधीत पूर्ण केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त आहे. मात्र, धारावीतील काही गट याठिकाणी येवून या सर्वेला प्रतिसाद देवू नका. सर्वे बोगस आहे, अधिकृत नाही असे सांगत रहिवाशांमध्ये भीती निर्माण करण्याचा आणि सर्वेला प्रतिसाद न दबाव टाकत होते. परंतू याला न जुमानता रहिवाश्यांनी हा सर्वे सुरळीत पार पाडण्यासाठी प्रकल्पाचे अधिकारी व अदानी समुहाचे कर्मचारी यांना सहकार्य केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.