बेघर कुटुंब, देहविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी यांना मदतीचा हात पुढे केल्यांनतर, आता महापालिकेच्यावतीने आदिवासी पाड्यातील गरीब कुटुंबांनाही मदत करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुलुंड आणि भांडुपमधील पळस पाडा, खिंडीपाडा, भानशील गाव, साईबांगोडा, उल्टन पाडा या आदिवासी पाड्यातील कुटुंबांना महापालिकेच्या नियोजन विभागाच्यातीने रेशन किटचे वाटप करण्यात आले आहे.
संचारबंदीत आदिवासी कुटुंबांचे हाल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे आदिवासी पाड्यांमधील कुटुंबांचे प्रचंड हाल होत आहेत. आदिवासी पाडे हे शहरापासून काही अंतरावर असल्याने, त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण जात आहे. अशा स्वरुपाच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. त्यामुळे महापालिकेच्या नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व एस आणि टी विभागाच्या समाजविकास अधिकारी वेदिका पाटील यांच्या खात्या अंतर्गत, विविध सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने भांडुप आणि मुलुंड मधील पळस पाडा, खिंडी पाडा, भानशील गाव, साईबांगोडा, उल्टन पाडा या आदिवासी पाड्यांमध्ये रेशन किट वाटप करण्यात आले.
(हेही वाचाः ‘त्या’ महिलांच्या हाती पडले जीवनाश्यक वस्तूंचे रेशनकिट)
आदिवासी बांधवांनी मानले आभार
महापालिकेकडून दोन वेळचे जेवण (अन्न पाकिटे) दिली जात असून, कांदे-बटाटे, गहू पीठ, तांदूळ, कडधाने, मास्क अशा वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. या आदिवासी पाड्यांमधील बांधवांनी महापालिकेच्या नियोजन विभागाचे मनापासून आभार मानले. एस व टी विभाग समुदाय संघटक सानिया देसाई यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने हे आयोजन केले. यावेळी मुलुंड युथ फाऊंडेशन स्वयंसेवी संस्थेच्या तरुणांनी यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
Join Our WhatsApp Community