५०० रुपये द्या, मृताचे तोंड दाखवतो! कोविड सेंटरमधील घृणास्पद प्रकार!

रुग्णालयात दाखल होणारा कोरोनाबाधित रुग्ण बरा व्हावा, अशी सदिच्छा बाळगण्याऐवजी त्याचा मृत्यू व्हावा, अशी चिरीमिरीसाठी मनीषा बाळगणाऱ्या महाभागांचा सुळसुळाट सध्या महाराष्ट्रातील विविध कोविड रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये सुरु आहे, हे दुर्दैव आहे. 

133

कोरोना महामारी कुणासाठी आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरत आहे, तर कुणासाठी पैसे कमावण्याची संधी बनली आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. घरातील कुणाचे वडील, भाऊ, बहीण, आई यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो आणि अवघ्या घराची धावपळ सुरु होते. नातेवाईक धावपळ करत रुग्णाला कोविड सेंटर किंवा रुग्णालयात दाखल करतात आणि ‘जगला तर आपला, नाही तर देवाचा’, अशी मानसिकता पहिल्या दिवसापासून करतात. तरीही ते आशावादी असतात. मात्र ऑक्सिजन, औषधाचा तुटवडा यामुळे रुग दगावतो. नातेवाइकांना फोन केला जातो. जीवाच्या आकांताने नातेवाईक धावत येतात. डॉक्टर रुग्ण गेल्याचे सांगतात. त्या मृताच्या नातलगांपैकी कुणी पत्नी, मुलगा, मुलगी, वडील हात जोडतात आणि ‘एकदा तरी तोंड दाखवा’, अशी विनंती करतात, त्यावेळी त्यांना ‘५०० रुपये द्या, तरच तोंड दाखवतो’, असे म्हटले जाते. ही परिस्थितीत नुसती साताऱ्याची नाही, तर थोड्या फार फरकाने अवघ्या महाराष्ट्राची आहे.

…आणि नातेवाईक खचून जातात!

सातारा जम्बो सेंटरमध्ये मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आधीच रुग्ण संख्या वाढल्याने सहजासहजी बेड मिळत नाही. अशा परिस्थितीत मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना जर श्वास घ्यायला त्रास झाला, तर त्याला रुग्णालयात दाखल करण्याशिवाय पर्याय नसतो, अशा वेळी घरातील सगळे जण रुग्णाला घेऊन पळापळ करू लागतात. आता तर मुंबईसारख्या भागात पैसे देऊन बेड मिळवून दिले जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. ग्रामीण भागातही अशा रुग्णांच्या नातेवाईकांची लूट सुरु होते. रुग्णालयात दाखल केल्यावर नातेवाईकांचा रुग्णाशी संपर्क तुटतो. डॉक्टरांच्या हवाली करून नातेवाईक घरी येऊन देवाचा धावा करू लागतात. सुरुवातीचे २-३ दिवस रुग्ण स्थिरावतोय असे कळवले जाते, मात्र अचानक एक दिवस रुग्णालयातून कळवले जाते, तुमचा रुग्ण गेला आहे.

(हेही वाचा : धनू भाऊंची ‘ती’ प्रेमकथा आता उलगडणार!)

नातेवाईकांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेतात!

अशा वेळी सध्याच्या नियमानुसार आपल्याला काहीही अंत्यसंस्कार करता येणार नाही, हे आधीच माहिती असल्याने ‘शेवटचे एकदा तरी तोंड पाहता येईल का’, या आशेने घरातील शक्य तेवढी मंडळी रुग्णालयात धाव घेतात. त्यांच्या याच आगतिक परिस्थितीचा गैर फायदा घेतला जात आहे. सातारा जम्बो कोविड सेंटरमध्ये मृतांच्या नातेवाईकांना ‘५०० रुपये द्या तोंड दाखवतो’, असे म्हटले जाते. दुःखात बुडालेले नातेवाईक सरळ पैसे काढून देतात. याची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

लुबाडणूक करणारी साखळी! 

काही रुग्णालयांमध्ये तर यापुढेही नातेवाईकांची लूट होते. मृतदेह प्लॅस्टिकमध्ये बांधणारे, मृतदेहाची नोंदणी करणारे, वॉर्डात काम करणाऱ्या आया, मृतदेह रुग्णवाहिकेत चढवणारे, स्मशानात नेल्यावर तेथील कर्मचारी असहा सगळ्या टप्प्यांवर ढसाढसा रडणाऱ्या नातेवाईकांना निर्लज्जपणे पैसे मागितले जातात. परिस्थितीसमोर हतबल झालेले नातेवाईक पैसे देतात, मात्र अशा एक-एक करून दिवसभरात या साखळीतील सगळे घटक लुबाडणूक करून हजारो पैसे मिळवतात. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणारा कोरोनाबाधित रुग्ण बरा व्हावा, अशी सदिच्छा बाळगण्याऐवजी त्याचा मृत्यू व्हावा, अशी चिरीमिरीसाठी मनीषा बाळगणाऱ्या महाभागांचा सुळसुळाट सध्या महाराष्ट्रातील विविध कोविड रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये सुरु आहे, हे दुर्दैव आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.