Baramati Lok Sabha Constituency : विजय शिवतारेंच्या विरोधाचा अजित पवारांना बसणार फटका; काय आहेत त्यामागील कारणे? 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबात फूट पडून याच कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे दोन उमेदवार बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

316
– नित्यानंद भिसे 
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामती लोकसभा मतदार संघ (Baramati Lok Sabha Constituency) सध्या जोरदार चर्चेत आहे. याला कारण इथे पवार कुटुंबातीलच नणंद आणि भावजय यांच्यात होणारी थेट लढत. यंदा खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे आव्हान आहे. परंतु मध्येच एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांचे उट्टे काढण्यासाठी बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha Constituency) लढवण्याची घोषणा केली. ज्यामुळे बारामतीत तिरंगी लढत होणार का, असे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवतारे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. मी जरी माघार घेतली तरी अजित पवार यांचा उमेदवार सुनेत्रा पवार विजयी होणार नाहीत, असे शिवतारे म्हणाले आहेत. विजय शिवतारे हे कोणत्या मुद्याच्या जोरावर अजित पवारांना इतके मोठे आव्हान देत आहेत, यावर आता तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

१ लाख मतांच्या जोरावर विजय शिवतारे देऊ शकतात धक्का 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांना ८२,३३९ मते मिळाली होती, २०१९ मध्ये त्यांना ९९ हजार ३०९ मते मिळाली होती. याचा अर्थ विजय शिवतारे यांच्याकडे १ लाख हक्काची मते आहेत. आता बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha Constituency) निवडणुकीचा इतिहास बघूया. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांना ५ लाख २१ हजार ५६२ मते मिळाली, त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी महादेव जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली होती. २०१९ मध्ये सुप्रिया सुळे यांना ६ लाख ८६ हजार ७१४ मिळाली होती, तर कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार ९४० मते मिळाली होती. बारामतीत दोन्ही वेळेच्या निवडणुकीत किमान १ लाख मताधिक्क्याने सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत.

शिवतारे कसे महागात पडू शकतात?

यंदाच्या निवडणुकीत पवार कुटुंबात फूट पडून याच कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे दोन उमेदवार (Baramati Lok Sabha Constituency) निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे पूर्वापार पवार कुटुंबाच्या मतांमध्ये फूट पडणार आहे. त्यातून अजित पवार यांनी नवा सवतासुबा केल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या अर्थात पवार कुटुंबियांकडील मतांची तजवीज करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांनी आधीपासूनच मतदारांना दम देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शिवतारे यांची १ लाख मते निर्णायक भूमिका बजावणार आहेत. जर विजय शिवतारे यांनीही निवडणूक लढवली तर १ लाख मते कमी होतील, ज्याचा फटका अजित पवारांना बसू शकतो. आणि जरी विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवली नाही तरी ते त्यांची मते सुप्रिया सुळे यांच्या बाजूने वळवू शकतात, ज्याचा फटका अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच बसू शकतात. म्हणूनच ज्या अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘तू यंदा कसा आमदार बनतोस ते बघतोच’, असे सांगत शिवतारे यांचा पराभव केला होता. आता तेच शिवतारे अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे ‘तुमचा उमेदवार खासदार कसा बनतो ते बघतोच’, असे सांगत आहेत का?, असे यातून प्रथित होत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.