मुंबई महापालिका आयुक्त हे यापूर्वीचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याप्रमाणेच व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठका घेत मुंबईवर लक्ष ठेवून आहेत. आता शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील आयुक्तांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. कोविडमुळे सार्वजनिक कार्यक्रमांसह पक्षांच्या नेत्यांना प्रत्यक्ष न भेटता ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झूमवरच उद्घाटन तसेच मार्गदर्शन करत आढावा बैठका घेताना दिसत आहेत.
पर्यावरण मंत्र्यांना गर्दी नकोशी
राज्याचे पर्यावरण मंत्री व राज शिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांना कोविडची बाधा झाल्यानंतर, त्यांनी आता लोकांमधील संपर्क टाळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एवढेच नाही तर स्वत:च्या विभागातही ते आता जात नसून, वरळीतील शिवसेना नेत्यांच्या माध्यमातून ते विधानसभा मतदार संघातील कामे करत आहेत. कोविडनंतर आदित्य ठाकरे यांना आता गर्दी नकोशी झालेली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांकडून लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाला ते झूमद्वारे सहभागी होतात.
(हेही वाचाः आदित्य बोले, चहल डोले! २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र!)
असे केले ऑनलाईन उद्घाटन
आदित्य ठाकरे यांनी २१ एप्रिल रोजी शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांच्या प्रयत्नाने वडाळा अॅक्वर्थ रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ऑनलाईनद्वारे उद्घाटनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिवसेना नगरसेविका सान्वी तांडेल यांच्या प्रयत्नातून चुनाभट्टी येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे प्रसुतीगृह, नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांच्या प्रयत्नातून ताडदेव वेलिंग्टन स्पोर्टस क्लब, नगरसेविका समृध्दी काते यांच्या प्रयत्नातून चेंबूर शनैश्वर सभागृहातील लसीकरण केंद्र, वरळीतील एनएससीयमधील ड्राईव्ह इन लसीकरण, माजी महापौर श्रध्दा जाधव तसेच नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या प्रयत्नाने त्यांच्या विभागातील लसीकरण केंद्र, तसेच बोरीवलीतील सावित्रीबाई फुले रुग्णालय आदी रुग्णालय व लसीकरण केंद्रांच्या लोकार्पणामध्ये आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष हजेरी लावण्याऐवजी व्हीसीवरुन उद्घाटन केले होते.
‘आदित्य’च्या संपर्कासाठी ‘सूरज’ हवा प्रसन्न
शिवसेना पक्षप्रुख उध्दव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे मंत्री बनल्यानंतर आधीच पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची भेट होत नाही. त्यातच लोकप्रतिनिधींनाही आता त्यांचे दर्शन व संपर्कही दुर्लभ झाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या अपॉइंटमेंट सूरज चव्हाण हे पाहत असतात. आदित्य ठाकरे यांचा जेव्हा संपर्क होत नाही, तेव्हा सूरज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला जातो. मात्र, सुरज चव्हाण हे काही जुन्या शिवसैनिकांना आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचूच देत नसल्याच्या तक्रारी, मागील काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत.
(हेही वाचाः आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील प्रकल्पाला कोरोनाने रोखले…)
संचारबंदी नक्की कुणासाठी?
कोविडमुळे कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे स्पष्ट असताना राजकीय पक्षांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. यामध्ये महापालिकेचे अधिकारीही सहभागी होत आहेत. त्यातच अशा कार्यक्रमांचे उद्घाटन हे आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील मंत्री झूमद्वारे करत असल्याने, संचारबंदीचे कडक निर्बंध कुणासाठी, असा सवालच आता उपस्थित होऊ लागला आहे.
Join Our WhatsApp Community