राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठी जीवितहानी झाल्यानंतर आता तिसरी लाट येणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेला रोखण्यााठी नियोजन सुरू करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्याची १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनची तयारी
कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सुतोवाच करण्यात येत आहे. यावेळी लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे. तशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली. अजित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रोखण्यासाठी लसीकरण आणि ऑक्सिजन वाढवण्याची तयारी सुरू आहे. सध्या राज्याची १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनची तयारी आहे, असेही ते म्हणाले. तर भारतीय बायटेकने पुण्यामध्ये लसीकरण निर्मिती करण्यासाठी तब्बल २८ एकर जमिनीची मागणी केली असून त्यासाठी सगळ्या परवानग्या देण्यात आल्याची माहितीही अजित पवारांनी दिली.
(हेही वाचा : जे ओबीसींना ते मराठ्यांना द्या! चंद्रकांत पाटलांचा आग्रह!)
कोंढवा येथील कोविड सेंटरचे उद्घाटन
पुणे महानगरपालिका, दि मुस्लिम फाऊंडेशन व नॉलेज पार्क चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा खुर्द मिठानगर प्रभाग क्रमांक 27 येथील संत गाडगे महाराज शाळेत उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहातून ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार चेतन तुपे, नगरसेवक ॲड. अब्दुल गफुर अहमंद पठाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community