मुंबईतील उद्यान, मनोरंजन मैदानासह मोकळ्या जागांची देखभाल करण्यासाठी महापालिकेच्यावतीने दरवर्षी कंत्राटदारांची निवड केली जाते. यावर्षीही महापालिकेच्यावतीने प्रत्येक प्रशासकीय कार्यालयातील उद्यान व मैदान देखभालीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करून त्यावर तब्बल १३८ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र, या देखभाल व दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी प्रत्यक्षात कंत्राटदारांकडून कोणत्याही प्रकारची देखभाल केली जात नाही की सुरक्षा पुरवली जात. मात्र कोणतीही देखभाल केली जात नसतानाही महापालिकेच्यावतीने कोट्यवधी रुपयांची खैरात केली जात असल्याची बाब समोर आली आहे. (BMC)
दोनच दिवसांपूर्वी वडाळा येथील महर्षी कर्वे उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडलयाने दोन लहान भावंडाचा मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणी माटुंगा पोलिसांनी सुपरवायझर विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. या उद्यानात जमिनीत ६ फूट खोल आणि ८ फूट लांब असलेल्या या पाण्याच्या टाक्यांची दोन्ही झाकणे गायब होती. त्या जागी काळ्या रंगाच्या प्लास्टिक कागदाने झाकणाची जागा बंदिस्त करण्यात आली होती. दोन्ही भावंडे खेळत असताना या टाकीत पडल्याने त्यांचा बुडून त्यांचा मुत्यू झाला होता. या उद्यानाच्या देखरेखीच्या कामासाठी महापालिकेने कंत्राटदार नेमला आहे. एफ उत्तर विभागातील ५८ उद्यान,मैदान आणि मोकळ्या जागांसाठी महापालिकेने हिरावती एंटरप्रायझेस या कंपनीची निवड केली होती. या देखभाल व दुरस्तीसाठी सुमारे सहा कोटींचे कंत्राट दिले होते. त्यात या उद्यानाच्या समावेश होता आणि या उद्यानाच्या देखभालीसाठ संबंधित कंत्राटदाराने सुपरवायझरची नेमणूक केली होती, त्यामुळे सुपरवायझर विरोधात पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. (BMC)
(हेही वाचा – Mumbai Crime : मुंबईतील सुप्रसिद्ध ‘पंजाबी घसीटाराम हलवाई’च्या व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा दाखल)
सुरक्षात्मक उपाययोजना करणे ही सुध्दा कंत्राटदाराची जबाबदारी
या उद्यानाची देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीची आहे. परंतु त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकच तैनात नव्हता. तसेच टाकीच्या उघड्या भागावर झाकणे नसल्याने ते बसवण्याची जबाबदारी संबंधित कंत्राट कंपनीची होती आणि झाकणे नसल्याने त्या टाकीत कुणी तरी पडेल याची काळजी घेऊन सुरक्षात्मक उपाययोजना करणे ही सुध्दा कंत्राटदाराची जबाबदारी होती. परंतु ही सुरक्षात्मक उपाययोजना न करणे आणि सुरक्षा रक्षक नेमला असेल तर त्यांनी त्याठिकाणी सुरक्षा न राखणे आदींमुळे संबंधित सुपरवायझरसोबतच संबंधित कंपनी आणि महापालिकेच्या एफ उत्तर विभागातील कनिष्ठ वृक्ष अधिकारी हाही तेवढाच जबाबदार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन काम न करता आधीच कंत्राटदारांना मदत करत असून याप्रकरणी केवळ सुपरवायझरविरोधात एफआयआर दाखल करून एकप्रकारे कंत्राटदारांना तसेच अधिकाऱ्यांना वाचवण्याचे काम करत असल्याचे बोलले जात आहे. (BMC)
दरम्यान, उपायुक्त (उद्यान) किशोर गांधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत उद्यान विभागाच्यावतीने चौकशी सुरू असून या विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे म्हटले. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या उद्यानाची देखभाल होत होती किंवा नाही ही बाबही या अहवालातून समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community