कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रुप धारण केलं आहे. त्यामुळे ही लढाई आता मोठी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता फॅमिली डॉक्टरांना आवाहन केले आहे. कोविड विरुध्दची लढाई लढण्यासाठी “माझा डॉक्टर” म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंब प्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. या डॉक्टरांनी गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य उचलावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
जगभरात प्रत्येक घराचा एक स्वत:चा कुटुंबाचा डॉक्टर असतो. आपल्याला आपल्या त्या माझ्या डॉक्टरवर म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टरवर खूप विश्वास असतो. या डॉक्टरांनाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, त्याच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती असते, घरातल्या लोकांचे आजार माहीत असतात, असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोरोना विरोधातील लढ्यासाठी ठाकरे सरकारकडून राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ अशी संकल्पना मांडत मैदानात उतरण्याचं आवाहन केलं. डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर राहुल पंडित यावेळी उपस्थित होते.
(हेही वाचाः आधार कार्ड नसेल तर लस मिळणार का? वाचा काय आहे उत्तर)
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री
आज मला तुमच्या या अनुभवाची गरज आहे, तुमच्या सहकार्याची आणि सेवेची गरज आहे. आजही 70 ते 75 टक्के रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना आपण रुग्णालयात दाखल करुन घेत नाही किंवा तसा सल्ला देत नाही. त्यांच्यावर घरच्या घरी उपचार करतो, काहींना तर औषधांची गरज न पडता ते बरे होतात. एकीकडे ही स्थिती आहे तर दुसरीकडे आपल्या लक्षात येते की मृत्यूदर वाढतो आहे, मग त्याची कारणे शोधली तर पेशंट उशिरा रुग्णालयात दाखल होतात हे कारण प्रामुख्याने समोर येते. रुग्ण घरच्या घरी अंगावर काही गोष्टी काढतात आणि उशिरा रुग्णालयात दाखल होतात. मला यामध्ये तुम्हा सर्वांचे सहकार्य हवे आहे. रुग्णाची कोविड स्थिती, त्याला असलेल्या सहव्याधी आणि त्याची ऑक्सिजन पातळी लक्षात घेणे, योग्यवेळी त्याला योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करणे, रुग्णालयात दाखल करण्याची गरज असेल, तर अंगावर न काढता त्याला त्याच्या गरजेनुसार संबंधित रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू करणे, या गोष्टी फॅमिली डॉक्टरने करणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीचे गृह विलगीकरणातील रुग्णाचे व्यवस्थापन केल्यास मृत्यूदर कमी करता येऊ शकेल.
(हेही वाचाः आता म्युकरमायकोसिसच्या औषधाचा काळाबाजार?)
कोविडमुळे रुग्णांच्या शरीरातील साखर वाढते, त्यात रुग्णास मधुमेह असेल तर स्थिती आणखी बिकट होते, हे लक्षात घेऊन रुग्णाच्या रक्तातील साखर मर्यादित आणि स्थिर ठेवणे गरजेचे असते. हे आव्हानात्मक काम आहे, घरच्या घरी रुग्णाच्या उपचाराची जबाबदारी घेतलेल्या फॅमिली डॉक्टरांनी याकडे लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जवळच्या जम्बो कोविड केअर रुग्णालयात सेवा द्यावी
मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाचा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या राज्यभरातील सर्व डॉक्टरांना त्यांच्या सेवेचा विस्तार करण्याबाबत विनंती केली. माझा डॉक्टरांनी त्यांना शक्य असेल तिथल्या, त्यांच्या परिसरातील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे शासनाला सहकार्य तर होईलच, पण आपल्या भागातील डॉक्टर आपल्याला येऊन पाहून गेल्याचा आनंद ही रुग्णांना मिळेल. मला विश्वास आहे चांद्यापासून बांद्यापर्यंतचे “माझा डॉक्टर” म्हणून ज्यांची महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला ओळख आहे, ते या लढाईत उतरले तर आपण कोविडला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आता पावसाळा उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पावसाळा म्हटले की साथीचे आजार आले. या साथीच्या आजारांना रोखण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर असल्याचे व त्यात माझा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या फॅमिली डॉक्टरची भूमिका खूप महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.