लोकसभा निवडणुकीअंतर्गत नाशिक जिल्ह्यात २० मे रोजी मतदान संपन्न होईल. या अनुषंगाने लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे विविध माध्यमांतून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणजे आता पेट्रोलियम मंत्रालय आणि तेल कंपन्या आदर्श आचारसंहिता कालावधीत त्यांचे वेबसाईटवर मतदारांसाठी ‘प्रबोधनपर संदेश प्रदर्शित’ करणार आहेत.
भारत निवडणूक आयोग आणि पेट्रोलियम मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मतदारांचे शिक्षण आणि लोकशाही प्रक्रियेस बळकटी देण्याचे उपक्रम राबविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यानुसार आदर्श आचारसंहिता कालावधीत पेट्रोलियम मंत्रालय आणि तेल कंपन्या त्यांचे वेबसाईटवर मतदारांसाठी प्रबोधनपर संदेश प्रदर्शित करणार आहेत. या संदेशाद्वारे मतदारांना निवडणूक प्रक्रियेविषयी अधिक माहिती मिळणार आहे. देशभरात तेल कंपन्या मतदार शिक्षणाचे पोस्टर्स, फ्लेक्स आणि होर्डिंग्जच्या स्वरूपात त्यांच्या कार्यालयात तसेच प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करणार आहेत. देशभरात असलेली तेल कंपन्यांची कार्यालये, पेट्रोलपंप इ. निवडक ठिकाणी आता मतदार शिक्षणाचे संदेश पोस्टर्स, फ्लेक्स आणि होर्डिंग्जद्वारे झळकणार आहेत. स्वीप कार्यक्रमासाठी भारत निवडणूक आयोग तेल कंपन्यांना मतदार शिक्षणाचे साहित्य पुरविणार आहे.
(हेही वाचा – Thane: होळी आणि धुलिवंदनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त, अनुचित प्रकार टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना? जाणून घ्या… )
पेट्रोलियम कंपन्यांचा सहभाग
निवडणूक प्रक्रिया, मतदानाबाबत जनजागृती व्हावी, जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, यासाठी आयोगाकडून शासकीय / निमशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, एनजीओ, विविध यंत्रणा यांच्या सहाय्याने स्वीपच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. देशभरात मतदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोगाने नुकताच इंडियन बॅंक असोसिएशन आणि पोस्ट विभाग यांच्याशी सामंजस्य करार केला असून आता बॅंका आणि पोस्ट विभाग निवडणूक आयोगास मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सहाय्य करीत आहेत. त्यात आता पेट्रोलियम कंपन्यांनीही सहभाग नोंदवला आहे.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवाहन…
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाबाबत आयोगाकडून सर्वतोपरी जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आयोगाच्या हाकेस साद देऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे आणि जिल्ह्यात या लोकसभा निवडणुकीत मतदानाबाबत अभूतपूर्व उत्साह दाखवून मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकान्वये केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community