मनोरंजन मैदानांचा विकास करताना जास्तीत जास्त जागा मोकळी ठेवून उद्यान विषयक कामे आवश्यक असतानाच महापालिकेच्यावतीने जास्तीत जास्त कामे ही बांधकाम स्वरुपाची आणि विद्युत स्वरुपाची केली जात असून उद्यानाची कामे ही केवळ नाममात्र केली जात असल्याचे प्रकार आता समोर आले आहेत. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा खर्च इतर कामांवरच केला जात आहे. त्यामुळे उद्यान विकसित करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याची माहितीच समोर येत आहे. (Open Space)
दादरमधील हिंदुजा हॉस्पिटल जवळील डॉ. आर. के. धोटे उद्यान आणि दादर चौपाटीजवळील बाजीप्रभू उद्यानांमध्ये खेळाची साधने तसेच खुल्या व्यायामाचे साहित्य बसवण्याच्या कामांसाठी तब्बल ३. ७६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या दोन्ही उद्यानांच्या विकासासाठी बांधकाम स्वरुपात स्थापत्य कामांचा खर्च हा १.९० कोटी रुपये आहे, तर यांत्रिक व विद्युत कामांचा खर्च १.५७ कोटी रुपये एवढा आहे. तर उद्यान कामांसाठी केवळ २९ लाख रुपयेच खर्च केले जाणार आहे. (Open Space)
या प्रकारची कामे केली जाणार
माहिम पश्चिम येथील हिंदुजा रुग्णालय जवळील डॉ. आर. के. धोटे उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर जाळी, स्केटींग ट्रॅक व पदपथाभोवती बंड वॉल उभारणे, सुरक्षा चौकीची डागडुजी करणे, पदपथावर नविन पेव्हर ब्लॉक बसवणे, उद्यानाची रंगरंगोटी करणे, खेळाची साहित्य बसवणे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणे व ग्रील बसवणे, सोलार ट्री उभारणे आदी प्रकारची बांधकाम स्वरुपाची कामे व विद्युत व हिरवळीची कामे केली जाणार आहेत. तर दादरमधील वीर बाजीप्रभू उद्यानामध्ये खेळाची साधने तसेच खुल्या व्यायाम शाळेचे साहित्य तसेच विद्युत कामे केली जाणार आहेत असे उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दोन्ही उद्यानांच्या विकासासाठी महापालिकेच्यावतीने शाह अँड पारीख ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २७ टक्के उणे दराने बोली लावत हे काम मिळवले आहे. (Open Space)
त्यामुळे एकूणच महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अधिकाधिक स्थापत्य प्रकारच्या कामांचा अंतर्भाव करून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी थिम गार्डनच्या नावाखाली जेव्हा प्रत्येक गार्डनच्या विकासासाठी ३ ते ५ कोटी रुपयांचा खर्च केला जायचा तेव्हा तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांनी स्थापत्य प्रकारच्या बांधकामांवरील खर्च कमी करून उद्यान विषयक कामांवर अधिक खर्च करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पुढे उद्यानांचा विकास करताना उद्यान विषयक कामांवर अधिक खर्च केला जात होता. परंतु आता पुन्हा एकदा बांधकाम स्वरुपातील कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. (Open Space)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community