व्हेंटिलेटर्सच्या बाबतीत सचिन सावंत यांनी केलेला आरोप खोटा! आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

औरंगाबाद येथे पुरवण्यात आलेले काही व्हेंटिलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त चुकीचे असून, पूर्ण माहिती न घेताच प्रसिध्द करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

137

कोविड रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचाराच्या योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार गेल्या वर्षभरापासून राज्यांना कोविडच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सर्वतोपरी सहकार्य करत आहे. रुग्णालयात सध्या असलेल्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना व्हेंटिलेटर्ससह अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा एप्रिल 2020 पासून करत आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात मेक इन इंडिया अंतर्गत पुरवण्यात आलेले काही व्हेंटिलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले. मात्र हे वृत्त निराधार आणि चुकीचे असून, पूर्ण माहिती न घेताच प्रसिध्द करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच राज्यांना त्यांच्या विनंतीनुसार, या व्हेंटीलेटर्सचा पुरवठा करण्यात आला. या पुरवठादारांना पीएम केअर्स फंड मधून निधी देण्यात आलेला नाही, असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

औरंगाबादमधील व्हंटिलेटर्स प्रमाणित

ज्योती CNC ही मेक इन इंडिया उपक्रमा अंतर्गत कार्यरत व्हेंटिलेटर्स उत्पादक कंपनी आहे. औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये 150 व्हेंटिलेटर्सचा पुरवठा, ज्योती CNC कंपनीने केला. 19 एप्रिल 2021 रोजी 100 व्हेंटिलेटर्सची पहिली खेप औरंगाबाद इथे पोहोचली होती आणि त्यानंतर राज्य सरकारकडून मिळालेल्या वितरण यादीनुसार, विविध ठिकाणी हे व्हेंटिलेटर्स बसवण्यात आले. पहिल्या खेपेतील 100 पैकी 45 व्हेंटिलेटर्स मेडिकल कॉलेजमध्ये बसवण्यात आले. त्यानंतर, व्हेंटिलेटर्स योग्य प्रकारे बसवल्याचे आणि त्यांचे कार्य योग्य सुरू असल्याचे प्रमाणपत्र या सर्व व्हेंटिलेटर्ससाठी रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले, असे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचाः जंबो कोविड सेंटरमधील रुग्णांना इतर रुग्णालयांत हलवणार)

नव्या जागी व्हेंटिलेटर्स लावण्याचे काम राज्यातील अधिका-यांचे

या 45 व्हेंटिलेटर्सपैकी 3 व्हेंटिलेटर्स नंतर राज्याच्या अधिकाऱ्यांनी एका खाजगी (सिग्मा रुग्णालय) रुग्णालयात लावले. ते सुव्यवस्थित चालू असल्याचे प्रमाणपत्र रुग्णालय प्रशासनाने दिले होते. त्यानंतर, राज्यातील अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार, 45 पैकी 20 व्हेंटिलेटर्स आणखी एका खाजगी रुग्णालयात (एमजीएम रुग्णालय) लावण्यात आले. याबद्दल ज्योती CNC कंपनीला काहीही औपचारिक माहिती देण्यात आली नव्हती, त्यामुळे ज्योती CNC कंपनी व्हेंटिलेटर्सच्या पुनर्स्थापना प्रक्रियेत सहभागी नव्हती. नव्या जागी हे सर्व व्हेंटिलेटर्स राज्यातील अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवरच बसवण्यात आले होते.

रुग्णालय प्रशासनाची हलगर्जी

23 एप्रिल रोजी, जीएमसी रुग्णालयात व्हेंटिलेटर्स लावल्यानंतर चार दिवसांनी, आठ व्हेंटिलेटर्स काम करत नसल्याची तक्रार दूरध्वनीवरुन प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत, या विक्रेत्याच्या अभियंत्यांनी सर्व ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन, आठ व्हेंटिलेटर्सची पाहणी केली. तीन व्हेंटिलेटर्समध्ये रुग्णालयांनी फ्लो सेन्सर इंस्टॉल केलाच नसल्याचे त्यांना आढळले. एका व्हेंटिलेटरमधील ऑक्सिजन सेल सुरू नव्हते, तिथे नवा ऑक्सिजन सेल लावण्यात आला, त्यानंतर व्हेंटिलेटर सुरू झाले. त्यामुळे ही रुग्णालय प्रशासनाची हलगर्जी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘या’ कारणांमुळे मुंबईत लसीकरणाचा सावळागोंधळ! )

सचिन सावंत यांनी केला होता आरोप

पीएम केअर फंडातून पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये मोठा घोटाळा दिसून येत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर्स हे पूर्णतः निरुपयोगी असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी नेमलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीला आढळले आहे. त्यांच्या अहवालानुसार कंपनी तंत्रज्ञदेखील हे दुरुस्त करू शकले नाहीत. हा मोठा घोटाळा असून केंद्रामार्फत महाराष्ट्राला पुरवलेल्या सर्व व्हेंटिलेटर्सची राज्यस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.