रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar) हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमासाठी रणदीपने प्रचंड मेहनत घेतली आहे. हा चित्रपट बनवतांना ऐतिहासिक तथ्ये समोर येण्यासाठी प्रत्येकाने तेवढीच मेहनत, अभ्यास आणि रिसर्च केल्याचे समोर आले आहे. ऐरोली येथे रहाणाऱ्या 24 वर्षीय ऐश्वर्या बाचलने (Aishwarya Bachal) या चित्रपटासाठी वेशभूषा निवडल्या आहेत.
(हेही वाचा – Holi In Kashi Ayodhya : होळीच्या रंगात रंगली काशीनगरी; अयोध्येत यंदा ५०० वर्षांनी साजरा झाला सण)
चित्रपटासाठी रिसर्च महत्त्वाचा
ऐश्वर्या बाचलचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा तिचा बॉलिवूडपट आहे. पहिल्या बिग बजेट आणि वेगळ्या धाटणीच्या सिनेमासाठी ऐश्वर्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. “या चित्रपटासाठी रिसर्च खूप महत्त्वाचा होता. तसेच टीम वर्कमुळे हा सिनेमा शक्य झाला आहे. प्रोडक्शन डिझायनर नीलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा सिनेमा केला आहे. आर्ट डिरेक्टर सचिन पाटील, समिधा भोळे, प्रतीक बडगुजर या सर्वांनी मला मदत केली. शेवटपर्यंत आमचा या सिनेमावर रिसर्च सुरू होता. रणदीप हुड्डा यांना प्रत्येक गोष्टीचा ऐतिहासिक संदर्भ द्यावा लागत असे”, असे ऐश्वर्या बाचल हिने सांगितले.
छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये रणदीप हुड्डा यांचे लक्ष – ऐश्वर्या बाचल
“रणदीप हुड्डा सेटवर यायचे, तेव्हा त्यांच्या डोक्यात फक्त सावरकरांचा विचार सुरू असायचा. ते सेटवर आले की, सावरकरच आले आहेत, असं सेटवरील सर्वांना वाटत असे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये रणदीप हुड्डा यांचे लक्ष होते’ , अशाही आठवणी ऐश्वर्या हिने सांगितल्या.