Chandrapur Lok Sabha Constituency : जातीचे गणित मोडू शकतील का मुनगंटीवार?

२०१४ ला मोदी सरकारमध्येही हंसराज अहीर यांच्यावर चंद्रपूरची धुरा सोपवली होती. त्यातही त्यांनी या मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवलं. पण, सलग चार टर्म खासदार राहिलेल्या हंसराज अहीर यांना हरवून बाळू धानोरकरांनी २०१९ ला इतिहास रचला होता.

380
Chandrapur Lok Sabha Constituency : जातीचे गणित मोडू शकतील का मुनगंटीवार?
Chandrapur Lok Sabha Constituency : जातीचे गणित मोडू शकतील का मुनगंटीवार?

२०१९ला मोदी लाट असतानाही भाजपच्या ताब्यातून खेचून आणलेला एकमेव मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर (Chandrapur Lok Sabha Constituency). हा मतदारसंघ उमेदवारीपासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत चांगलाच चर्चेत राहिला. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकरांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली आणि त्यांनी चार टर्म भाजपाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा रोवला होता. राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसला फक्त चंद्रपूर जिंकण्यात यश मिळालं होतं. बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार होते. पण, त्यांचं अकाली निधन झालं.

आता या मतदारसंघात पोटनिवडणूक न होता थेट लोकसभेची निवडणूक लागली आहे. भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवली. चंद्रपुरातून हंसराज अहीर यांचं तिकीट कापून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवलं आहे. यामुळे अहीर समर्थकांमध्ये नाराजी बघायला मिळतेय. त्याचा मुनगंटीवारांना फटका बसेल का? दुसरीकडे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे त्याचा फटका कोणाला बसणार? हे सगळे प्रश्न आहेत. पण, त्याची उत्तरं जाणून घेण्याआधी या मतदारसंघाचा इतिहास, जातीय समीकरण, मतदारसंघाची रचना, इथल्या विधानसभा मतदारसंघाचं राजकीय बलाबल पाहुयात.

जातीय समीकरणं आणि मतदारसंघाची रचना

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ (Chandrapur Lok Sabha Constituency) हा ओबीसी बहुल आहे. वणी, आर्णी आणि वरोरा या तीन विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कुणबी मतदार आहेत. त्यामुळे इथल्या प्रत्येक निवडणुकीत कुणबी मतदार निर्णायक ठरतो. कुणबी मतांमुळे २०१९ ला बाळू धानोरकर यांचा विजय सुकर झाला होता. तसंच या मतदारसंघात आंबेडकरी चळवळींचाही मोठा प्रभाव आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आधी चंद्रपुरातलाच भाग येत होता. पण, २००९ मध्ये मतदारसंघाची पुनरर्चना होऊन यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला. चंद्रपुरातील चार आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ तयार होतो.

(हेही वाचा Sanjay Raut : पंतप्रधान मोदींचा अवमान करणे संजय राऊतांना भोवणार; भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार)

सहा विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल…

चंद्रपुरात (Chandrapur Lok Sabha Constituency) कोणाचा विजय होणार यामागे विधानसभा मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. वणीमधून भाजपाचे संजीवरेड्डी बोदकुरवार, अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या आर्णीमधून संदीप धुर्वे हे भाजपाचे आमदार आहेत. बल्लारपूरमधून भाजपाचे सुधीर मुनगंटीवार आमदार आहेत ज्यांना सध्या भाजपानं लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. राजूरामधून काँग्रेसचे सुभाष धोटे, वरोरामधून दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या आमदार आहेत. चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असून त्यांचा पाठिंबा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आहे.

काँग्रेसच्या गडाला भाजपानं असा लावला सुरुंग

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ (Chandrapur Lok Sabha Constituency) काँग्रेसचा गड होता. १९५२ ला लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अब्दुलभाई मुल्ला तहेराली विजय झाली होते. त्यानंतर १९५७ मध्ये व्ही. एन. स्वामी यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे राखण्यात यश मिळवलं.पण, १९६२ मध्ये हा मतदारसंघ अपक्ष उमेदवार लाल श्यामशाह लाल भगवानशाह यांनी जिंकला. पुढे १९६७ आणि १९७७ चा अपवाद वगळता चंद्रपूरने काँग्रेसचे खासदार दिल्लीत पाठवले. पण, हंसराज अहीर यांनी १९९६ ला काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला.पण, काँग्रेसनं १९९८ आणि १९९९ मध्ये पुन्हा जोरदार कमबॅक केलं. नरेश पुगलिया यांनी दोन्ही वेळेला काँग्रेसला त्यांचा गड परत मिळवून दिला. २००४ ला हंसराज यांनी पुन्हा बाजी मारली. अहीर चंद्रपुरातून सलग तीन टर्म निवडून आले. त्यामुळे २०१४ ला मोदी सरकारमध्येही हंसराज अहीर यांच्यावर चंद्रपूरची धुरा सोपवली होती. त्यातही त्यांनी या मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवलं. पण, सलग चार टर्म खासदार राहिलेल्या हंसराज अहीर यांना हरवून बाळू धानोरकरांनी २०१९ ला इतिहास रचला होता.

अशोक चव्हाणांची ती ऑडिओ क्लीप आणि बाळू धानोरकरांना उमेदवारी

2019 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यापासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत हा मतदारसंघ (Chandrapur Lok Sabha Constituency) सर्वाधिक चर्चेत होता. सुरुवातीला काँग्रेसकडून विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल मुत्तेमवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पण, पाहुण्याला म्हणजेच जिल्ह्याबाहेर नेत्याला उमेदवारी का? असा सवाल करत मुत्तेमवारांना विरोध झाला. विशाल यांनी माघार घेतली. इतक्यात बाळू धानोरकर हे उमेदवारीसाठी इच्छूक होतेच. त्यासाठी त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेशही केला होता. पण, इतकं झाल्यावरही काँग्रेसकडून तेली समाजाच्या विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर झाली. याच उमेदवारीच्या नाट्यात तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ऑडिओ क्लीप चांगलीच गाजली. धानोरकरांच्या उमेदवारीवरून माझ्या हातात काहीच नाही, असं चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार यांनी थेट राहुल गांधी यांना फोन केला. शेवटी ऐनवेळी काँग्रेसनं उमेदवार बदलून बाळू धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. ज्या धानोरकरांच्या उमेदवारीसाठी इतकं नाट्य झालं त्यांनीच काँग्रेसला राज्यात एक जागा दिली.अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडासाफ झाला असताना सलग चार टर्म भाजपकडे असलेला मतदारसंघ धानोरकरांनी खेचून आणला.काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करायचा आहे, अशा घोषणा भाजपकडून करण्यात येतात. पण, २०१९ ला काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं ते चंद्रपुरात.तेव्हापासून भाजपनं हा मतदारसंघ परत मिळविण्यासाठी कसरत सुरू केली आहे. जे. पी. नड्डांपासून देवेंद्र फडणवीसांच्या या मतदारसंघात सभा झाल्या. हा मतदारसंघ परत मिळवून देण्याची जबाबदारी भाजपनं सुधीर मुनगंटीवारांवर सोपवली आहे.

(हेही वाचा South Central Mumbai : दक्षिण मध्य मुंबईसाठी काँग्रेसची लॉबिंग : उबाठा शिवसेना हा मतदार संघ सोडणार का?)

बाळू धानोरकरांचं अकाली निधन

बाळू धानोरकर यांनी राज्यात काँग्रेसला एकमेव जागा मिळवून दिली. पण, त्यांना खासदारकीची टर्म पूर्ण करायला मिळाली नाही. त्यांचं मे २०२३ मध्ये किडनीच्या आजाराने निधन झालं. त्यामुळे नियमानुसार या मतदारसंघात पोटनिवडणूक लागणं अपेक्षित होतं.त्यामध्येही बाळू धानोरकरांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर या दावेदार होत्या. पण पोटनिवडणूक न लागता आता थेट लोकसभेची निवडणूक लागली आहे. यामध्येही प्रतिभा धानोरकर या पक्षाकडे उमेदवारी दिली आहे. नैसर्गिक न्यायाप्रमाणे उमेदवारीवर माझा हक्क आहे आणि ही उमेदवारी आपल्याला मिळणार असं प्रतिभा धानोरकर बोलून दाखवत होत्या. त्यांनी सोशल मीडियावरून तशा पोस्ट देखील लिहिल्या होत्या.

काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवार हे बाळू धानोरकर यांच्या पाठिशी होते. विजय वडेट्टीवार धानोरकरांच्या प्रचारात दिसले होते. पण, धानोरकरांच्या निधनानंतर विजय वडेट्टीवार यांनी स्वतः या मतदारसंघावर दावा ठोकला होता.विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणूक लढतील अशी चर्चा होती. शेवटी वडेट्टीवार यांनी मुलगी शिवानी वडेट्टीवार यांचं नाव पुढं केलं.शिवानी वडेट्टीवार यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या.तीन वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या लोकांना पक्षाकडे उमेदवारी मागायचा अधिकार नाही, असं म्हणत शिवानी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती.पण, प्रतिभा धानोरकर या जागेच्या प्रबळ दावेदार होत्या. त्यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली व दिल्लीत हायकमांडची भेट घेतली.”चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील स्थानिक नेत्याला उमेदवारी द्यावी, अशी चंद्रपूर (Chandrapur Lok Sabha Constituency) काँग्रेसमधल्या पदाधिकाऱ्यांची मागणी केली. विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ हा ब्रम्हपुरीत येतो. त्यामुळे शिवानी यांच्या नावाला स्थानिक काँग्रेसमधीलच नेत्यांचा विरोध होता,” असं चंद्रपुरातील स्थानिक पत्रकार  सांगतात.वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील अंतर्गत वादाचा काँग्रेसला फटका बसू शकतो का ? याबद्दल स्थानिक म्हणतात,”शिवानी वडेट्टीवार स्थानिक पातळीवर कुठल्याच रेसमध्ये नाहीत. त्यांना स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. वडेट्टीवार यांचा विधानसभा मतादरसंघ हा चंद्रपूरमध्ये नाहीतर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे धानोरकर यांना उमेदवारी मिळाली तरी वडेट्टीवार यांच्या नाराजीचा थेट फटका बसणार नाही.”

भाजपामध्येही अंतर्गत वाद

सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांच्यामध्ये सुप्त संघर्ष होता. पण, २०१९ च्या निवडणुकीत हा सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला.हंसराज अहीर केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि चार टर्म खासदार असून सुद्धा झालेला पराभव हा त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. या पराभवासाठी त्यांनी मुनगंटीवारांना कुठंतरी जबाबदार धरलं होतं. अहीर यांनी २०२० मध्ये वृत्तपत्रात एक जाहिरात प्रकाशित केली होती. यामध्ये कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतं कमी पडली याची माहिती त्यांनी दिली होती.सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी पडली होती आणि मुनगंटीवारांचा फोटो देखील या जाहिरातीवर नव्हता.अहीर यांची मुनगंटीवारांबद्दलची नाराजी ही वेळोवेळी दिसून आली.

(हेही वाचा संदेशखली येथील भाजपाच्या उमेदवार Rekha Patra यांना PM Narendra Modi यांचा फोन; शक्तिस्वरुपा म्हणून केले संबोधन )

आता २०२४ ला हंसराज अहीर यांचं तिकीट कापून मुनगंटीवारांना उमेदवारी देण्यात आली. यावेळीही अहीर समर्थक नाराज झाले आहेत. अहीर आणि मुनगंटीवार यांच्यातील या अंतर्गत वादाचा फटका भाजपला बसू शकतो का ? तर स्थानिकांशी चर्चा केली असता ते सांगतात, “हंसराज अहीर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. आजही ते लोकसभा मतदारसंघात (Chandrapur Lok Sabha Constituency) फिरत असतात. भाजपमध्ये जाहीररित्या एकमेकांचे उणीधुणी काढली जात नाही. अहीर शांतपणे काम करतात. असं असलं तरी दोघांमध्येही तीव्र टोकाचे मतभेद आहेत. समर्थकांमध्ये नाराजी आहे. पण, या नाराजीचा मतांवर किती परिणाम होईल हे निकालच सांगेल.”

चंद्रपुरात कोणते मुद्दे महत्त्वाचे?

२०१९ ची लोकसभा निवडणूक दारूच्या मुद्द्यावर गाजली. बाळू धानोरकर यांनी दारूबंदी उठवण्याची घोषणा प्रचारात केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात आली.हंसराज अहीर हे दारूच्या मुद्द्यापासून दूर राहिले. त्यामुळे त्यांना फटका बसला अशीही चर्चा चंद्रपुरात होती.

पण, २०२४ च्या निवडणुकीत दारूचा मुद्दा पूर्णपणे मागे पडला आहे. चंद्रपुरात कोळसा खाणी अधिक आहे. त्यामुळे इथं प्रदूषणाचा मुद्दा आहे. त्यावर कोणीही नेते बोलायला तयार नसतात.शिवाय, कोळसा खाणी, वीजप्रकल्प आणि उद्योगांसाठी भूमीअधिग्रहण झालं. पण तिथे इथल्या स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याची ओरड आहे. या भागात शेतात फक्त धान (भातपीक) पिकवलं जातं. पण, धानालाही योग्य भाव मिळत नाही.दुसरीकडे मराठा समाजातील नोंदी सापडलेल्या लोकांना कुणबी सर्टीफिकेट देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. त्याविरोधातही चंद्रपुरातील ओबीसी समाज एकवटला आहे. त्यांनी सरकारविरोधात उपोषण देखील केलं. खुद्द देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाचं उपोषण सोडवण्यासाठी चंद्रपूरला गेले होते. त्यामुळे ओबीसींचा मुद्दा देखील या निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.