वुप्पलादादियम नगय्या (Vuppaladadiyam Nagayya) हे चित्तूर नगय्या या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचं पूर्ण नाव वुप्पलदादियम नगय्या सरमा असे आहे. ते अभिनेता, गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक होते, ज्यांचं नाव तेलुगू आणि तमिळ सिनेमा तसेच तेलुगू थिएटरमध्ये अतिशय आदराने घेतले जाते. नगय्या हे भारतातील पहिल्या बहुभाषिक चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते.
चित्तूर नगय्या यांचा जन्म २८ मार्च १९०४ रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रेपल्लेजवळ एका लहानशा गावात एका तेलुगू कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामलिंग सरमा आणि आईचे नाव वेंकट लक्ष्मंबा असे होते. त्यांच्या आजीने त्यांना दत्तक घेतले होते. त्यांना तिरुपती देवस्थानमकडून शिष्यवृत्ती मिळाली होती आणि चित्तूर येथे पदवी घेतली. (Vuppaladadiyam Nagayya)
भारतीय चित्रपट पत्रकार बाबुराव पटेल यांनी नगय्या यांचे वर्णन “भारताचे पॉल मुनी” असे केले होते. १९४० आणि १९५० च्या दशकात नगय्या यांना दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेता मानले जात होते. १९६५ मध्ये, भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. विशेष म्हणजे पद्मश्री मिळवणारे ते पहिले दक्षिण भारतीय अभिनेता ठरले.
(हेही वाचा – Mumbai South Central Lok Sabha Constituency : दक्षिण मध्य मुंबईत शेवाळे विरुद्ध देसाई, कोण ठरेल सरस? )
महत्त्वाच्या भूमिका साकारल्या…
नगय्या यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देत सुमारे दोनशे तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची खासियत म्हणजे ते त्यांच्या भूमिकेचा आधी अभ्यास करायचे आणि मगच अभिनय करायचे. भक्त पोथना, त्यागय्या, चक्रधारी अशा चित्रपटांमधून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. सामाजिक चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. नगय्या यांनी तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतील सुमारे १५० चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या सन्मानार्थ, आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे ‘चित्तूर नगय्या कलाक्षेत्रम ऑफ आर्ट्स’ची स्थापना करण्यात आली.