Lok Sabha Election : निवडणूक कामासाठी नर्स आणि डॉक्टर्स…महापालिकेच्या रुग्णालयात उपचार करणार कोण?

274
BMC Hospital : नायर रुग्णालयातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा आरोप : त्या सहयोगी प्राध्यापकाचे निलंबन
BMC Hospital : नायर रुग्णालयातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा आरोप : त्या सहयोगी प्राध्यापकाचे निलंबन
लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election) करता महापालिकेच्या बा.य.ल. नायर रुग्णालयातील परिचारिका व वैद्यकीय अधिकारी यांची नेमणुकीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नर्स तसेच वैद्यकीय अधिकारी या पदावरील अधिकाऱ्यांची अनेक पदे ही रिक्त असून अत्यंत कमी मनुष्यबळामध्ये आरोग्य सुविधा पुरवली जात असतानाच निवडणूक कामासाठी नर्स आणि डॉक्टर यांच्या नेमणुकीचे आदेश निघाल्याने महापालिका रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आजवर झालेल्या निवडणुकीत आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळून इतर खात्यांमधील आणि विभागांमधील कर्मचाऱ्यांची सेवा निवडणूक (Lok Sabha Election) कामासाठी घेतली जात होती. पण आता आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांची ही सेवा घेतली जात असल्याने महापालिका रुग्णालयांचे आरोग्य बिघडले जाण्याची भीती वर्तवली  जात आहे.
आगामी  लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) पुढील महिन्यात होत असल्याने  या निवडणूकीच्या आवश्यक कर्तव्यासाठी बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालय येथील १४८ परिचारिका व वैद्यकीय अधिकारी संवर्गातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्यांना  १ व ६ एप्रिल २०२४ रोजी त्यांचे निवडणूक कामकाज विषयक प्रशिक्षण  यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले आहे. आणि त्यानंतर त्यांची नेमणूक निवडणूक कामकाजाकरता करण्यात येणार आहे
इंडियन मेडिकल कौन्सिलच्या नॉर्म्सप्रमाणे नायर रुग्णालयात १४५४ एवढ्या परिचारिकांची आवश्यकता  आहे. पण प्रत्यक्षात  केवळ ६८८ एवढ्याच परिचारिका रुग्णालयाच्या पटावर आहेत. या अपुऱ्या संख्येमुळे  परिचारिका वर्गाला रुग्णालयातील कामाचा अतिरिक्त ताण सहन करत  रुग्णाची सेवा बजावावी  लागत आहे. आता त्यातील  १४८ परिचारिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवडणूक कामासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे  नायर  रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्था कोलमडून पडेल आणि प्रचंड आणीबाणीची व गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
५०० डॉक्टरांना निवडणूक ड्युटी
मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायर, कुपर आणि नायर डेंटल  या सर्व रूग्णालयातील सुमारे ५०० डॉक्टरांना निवडणुक ड्युटी लागणार आहे. निवडणूक कामातून डॉक्टर आणि नर्ससह वैद्यकीय कर्मचा-यांना सूट असतानाही निवडणूक आयोगाने डॉक्टरांना निवडणूक डयुटीवर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. असेच केईएम रूग्णालयातील 900 पैकी 600 नर्सेसना निवडणूक ड्युटी लावण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, दी म्युनिसिपल युनियनचे उपाध्यक्ष  रंगनाथ सातवसे यांनी महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांना पत्र पाठवून लोकसभा निवडणूकीसाठी कर्तव्यार्थ पाठविण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाचा त्वरित्त फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, निवडणूक आयोग यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने ७ जून २०२३ रोजी एक आदेश पारित केला. त्या  आदेशातील १० व्या परिच्छेदामध्ये निवडणूक कामी वगळण्याच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची यादी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये  १०(१) (ii) नुसार वैद्यकीय कर्मचारी ,अधिकारी यांना निवडणूक कामातून वगळण्यात आलेले आहे. यामुळे नायर धर्मा. रुग्णालय व इतर केईएम, शीव, कुपर, नायर डेंटल रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टर्स यांना  या  कर्तव्यातून वगळण्यात यावे व तसा आदेश तातडीने पारित करावा,अशी विनंती केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.