दहिसरचा गड शिवसेनेच्या ताब्यातून गेल्यानंतर पुन्हा एकदा हा गड सर करण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर प्रयत्नशील आहेत. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे दहिसरची जागा शिवसेनेला गमवावी लागली आणि भाजपचे कमळ यामध्ये फुलले. परंतु पुन्हा एकदा विनोद घोसाळकर यांच्याकडून दहिसर विधानसभेची बांधणी केली जात आहे. प्रभाग क्रमांक सहामधील सार्वजनिक शौचालयांची निगा राखणाऱ्या संस्थांना घोसाळकर यांच्याहस्ते २० सॅनिटायझर मशीनचे मोफत वाटप करण्यात आले आहे. दहिसरमध्ये भाजपला शह देण्यासाठी घोसाळकर यांच्याशिवाय पर्याय नसल्याने अखेर शिवसेनेने त्यांना म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती बनवले आणि सभापती बनल्यानंतरही त्यांनी आता दहिसरची पुन्हा बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
(हेही वाचा : चक्रीवादळामुळे मुंबईतील ५८० कोरोनाग्रस्त रुग्णांचे रात्रीच स्थलांतर!)
२० स्वयंसेवी संस्थांना मोफत सॅनिटायझर मशीनचे वाटप केले!
दहिसरमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता विभागातील सार्वजनिक शौचालयामध्ये सॅनिटायझिंग करण्यासाठी शिवसेना उपनेते, म्हाडा दुरुस्ती मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांच्यातर्फे स्वखर्चाने दहिसर विधानसभा क्षेत्रातील विविध प्रभागात स्वयंसेवी संस्थांना मोफत सॅनिटायझर मशीन वाटप करण्यात येणार आहे. सार्वजनिक शौचालयातून कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शनिवारी दहिसर प्रभाग क्रमांक ६ मधील अंबा वाडी येथे विनोद घोसाळकर यांच्या हस्ते विभागातील शौचालयांची निगा राखणाऱ्या २० स्वयंसेवी संस्थांना मोफत सॅनिटायझर मशीनचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख, आमदार विलास पोतनीस, स्थानिक नगरसेवक व विधी समिती अध्यक्ष हर्षद प्रकाश कारकर, आर उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, माजी नगरसेवक व मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, शाखाप्रमुख प्रवीण कुवळेकर, शाखा संघटक दर्शना भरणे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. दिवसातून ५ वेळा विभागांतील सार्वजनिक शौचालयात सॅनिटायझर फवारणी करण्याची सूचना यावेळी पालिका आर/ उत्तर प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community