लसीकरणासाठी आधार कार्ड गरजेचे आहे, अशा पद्धतीच्या काही बातम्या सध्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे आधार कार्ड नसलेल्या नागरिकांना लसीकरणापासून वंचित रहावं लागणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच संदर्भात आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आधार कार्ड शिवाय कोणीही आवश्यक सेवांपासून वंचित राहू शकत नाही. असे युनिक आयडेन्टीफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया(यूआयडीएआय)कडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोविड-19ची तीव्र दुसरी लाट पाहता याबाबत हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
यूआयडीएआयची माहिती
आधारसाठी एक प्रस्थापित अपवाद हाताळणीसाठी एक यंत्रणा(ईएचएम) विकसित करण्यात आली असून, आधार कार्डवरील 12 अंकी बायोमेट्रिक आयडी नसतानाही, आवश्यक त्या सुविधा मिळण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. असे यूआयडीएआयच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोणालाही काही कारणांमुळे आधार कार्ड काढणे शक्य झाले नसेल, त्यांना कुठल्याही आवश्यक सेवांपासून वंचित ठेवता येणार नाही, असे आधार कायदा, 2016 नुसार स्पष्ट करण्यात आले आहे.
(हेही वाचाः आता म्युकरमायकोसिसच्या औषधाचा काळाबाजार?)
…तर तक्रार नोंदवावी
आधार कार्ड नसल्यामुळे काही जणांना उपचारांपासून किंवा लसीकरणापासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे याबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. उपचार, औषधे किंवा लसीकरण या आवश्यक सुविधा आधार कार्ड नाही, म्हणून कोणीही नाकारू शकत नाही, अशी माहिती यूआयडीएआय कडून देण्यात आली आहे. तसेच कोणालाही अशाप्रकारे सुविधा नाकारण्यात आल्यास संबंधित विभागाच्या उच्चस्तरीय अधिका-यांकडे त्याबाबत तक्रार नोंदवावी, असे देखील सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community