- सुजित महामुलकर
शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना उबाठा (Shivsena UBT) या दोन्ही पक्षांनी गेल्या दोन दिवसांत आपली लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, मात्र कल्याण मतदार संघाचा उमेदवार एकानेही घोषित केला नाही. शिवसेना शिंदे यांच्या पक्षाकडून विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून त्यांना टक्कर देणारा चेहरा नसल्याने शिवसेना उबाठाची चिंता वाढली आहे. त्यामुळे उबाठा अखेरचा पर्याय म्हणून एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
कल्याणवर भाजपाचा दावा
कल्याण मतदार संघातून उच्चशिक्षित डॉ. श्रीकांत शिंदे दोन वेळा, २०१४ आणि २०१९, लोकसभेत निवडून गेले असून त्यांच्या मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे. गेल्या २०-२१ महिन्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून श्रीकांत यांचा राजकारणात दबदबा वाढला असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी भाजपाने या मतदार संघावर आपला दावा केला असून श्रीकांत यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपाकडून पहिला विरोध नोंदवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हा विरोध मावळला जाऊ शकतो.
सहापैकी पाच विधानसभा महायुतीकडे
कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी पाच, म्हणजेच अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण हे महायुतीकडे असून एका मुंब्रा-कळवा मतदार संघात राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा आमदार आहे. त्यामुळे श्रीकांत यांना निवडणुक सोपी असली तरी दिघे कुटुंबातील व्यक्ति त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्यास विरोधी उमेदवारला गृहीत धरून चालणार नाही.
शिंदे विरुद्ध दिघे?
४४-वर्षीय केदार दिघे हे आनंद दिघे यांच्या लहान भावाचा मुलगा असून गेल्या ७-८ वर्षापासून केदार सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २००६ पासून, धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान या अशासकीय संस्थेमार्फत ग्रामीण भागातही काम करतात. दिघे यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना उबाठा गटाला (Shivsena UBT) ठाणे जिल्ह्यात शिवसेनेसमोर चांगली लढत देता येऊ शकेल, तसेच बऱ्यापैकी सहानुभूतीही मिळवता येऊ शकते. मते मिळवण्यासाठी प्रचारात आनंद दिघे यांच्या सामाजिक कार्याचा दाखला देणे उबाठाला सोपे जाऊ शकते. यामुळे केदार यांच्या नावाचा शिवसेना उबाठाकडून (Shivsena UBT) गंभीरपणे विचार केला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community