कोविड कार्यगटाच्या शिफारशीनुसार, कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी वाढवण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून 13 मे रोजी सांगण्यात आले होते. त्यानुसार आता को-विन पोर्टलवर सुद्धा या दोन डोसमधील अंतराचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यामुळे ज्यांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना आता 84 दिवसांनंतर दुस-या डोससाठी नोंदणी करण्यात येणार आहे.
आरोग्य मंत्रालयाची माहिती
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी 6 ते 8 आठवड्यांवरुन 12 ते 16 आठवडे करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांनी को-विनवर नोंदणी करुन लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना आता दुस-या डोससाठी कमीत-कमी 84 दिवसांनंतर नोंदणी करता येणार आहे. वॉक-इन रजिस्ट्रेशन करणा-या नागरिकांनी सुद्धा या नवीन बदलाची नोंद घ्यावी, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. ज्यांनी याआधीच दुस-या डोससाठी 84 दिवसांच्या आत ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्यांचे लसीकरण रद्द केले जाणार नाही, असेही आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. यापुढील कोविशिल्डच्या दोन डोसमधील नोंदणीचा कालावधी मात्र, 84 दिवसांचा करण्यात आला आहे.
➡️ #CoWIN digital Portal Reconfigured to Reflect Change in Dose Interval of #Covishield Vaccine to 12-16 weeks.
➡️ Already Booked Online appointments for 2nd Covishield Dose will remain Valid.https://t.co/fue31c2uEI pic.twitter.com/eJXEF7i1Gw
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) May 16, 2021
…म्हणून वाढवला कालावधी
डॉ. एन के अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या, कोविड कार्यगटाच्या शिफारशीवरुन हा कालावधी वाढवण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आता 6 ते 8 आठवड्यांवरुन 12 ते 16 आठवडे करण्यात आले आहे. युके मध्ये आढळलेल्या काही प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे कोविशिल्डचा दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यांनंतर घेतल्यास, जास्त प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोविड कार्यगटाने हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या बाबतीत मात्र, कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
Join Our WhatsApp Community