“तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक
मुंबई, ठाणे आणि परिसरातील परिस्थितीबाबतही त्यांनी नियंत्रण कक्ष तसेच पालिका आयुक्तांकडून माहिती घेतली तसेच विशेषतः कोविड रुग्णांना त्यांच्या उपचारात काही अडथळे येणार नाही हे पाहण्याच्याही सूचना दिल्या. आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.
(हेही वाचा : ऐन वादळात मुंबईच्या रडारमध्ये बिघाड? )
दुपारी २ वाजेपर्यंत विमानतळ बंद!
सकाळपासूनच तुफान पाऊस आणि सोसाट्याचा वारा घेऊन आलेल्या तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) सर्व विमानसेवा 17 मे रोजी सकाळी ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वरील कालावधीत कोणत्याही विमानाचे आगमन किंवा प्रस्थान होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ही घोषणा केलेली आहे.
#FlyAI: Mumbai Airport will remain closed from 1100hrs to 1400 hrs today due strong winds/ inclement weather. Stay tuned for updates please.
— Air India (@airindiain) May 17, 2021
मुंबईत १३५ ठिकाणी झाडे कोसळली!
तौक्ते चक्रीवादळाने १६ मे रोजी रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरात परिणाम होऊ लागला आहे. रात्रीपासून झाडे कोसळली महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार १६ मे पासून १७ मे सकाळपर्यंत ५० झाडे आणि फांद्या पडल्याच्या तक्रारी आल्या, तर सोमवार, १७ मे रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत मुंबईतील शहर आणि उपनगरात सुमारे १३२ झाडे आणि फांद्या पडल्याच्या तक्रारी आल्याचे कळवले. तसेच ५ ठिकाणे घरे आणि भिंती कोसळल्याचे वृत्त आहे.
मुंबईत पाणी तुंबले!
मुंबईत १६ मे रात्रीपासून चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस झाल्याने मुंबईत पावसाळ्याप्रमाणे ठिकठिकाणी पाणी तुंबले. मंत्रालय, विधानभवन, पेडर रॉड आणि अंधेरी सब वे, हाजी अली या भागांमध्ये ३ फुटापर्यंत पाणी तुंबले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला.
ठाणे परिसरात १५ झाडे पडली!
या चक्री वादळामुळे ठाण्यातही सोसाट्याचा वारा वाहत आहे. १७ मे पर्यंत ठाणे आणि परिसरात एकूण १५ झाडे कोसळल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली. यात २ रिक्षांचे नुकसान झाले.
Join Our WhatsApp Community