>> नमिता वारणकर
परीक्षा संपली की, उन्हाळी शिबिरांचे वेध लागतात. कौशल्याबरोबरच सुटीमध्ये मुलांचा वेळ सत्कारणी लागावा म्हणून ही संस्कार वर्ग असतात. त्याकडे फक्त विरंगुळा म्हणून पाहू नका. त्यांचे महत्त्व लक्षात घ्या. (Summer Camps)
संस्कार वर्ग आणि शिबिरात मुलांना तात्त्विक मूल्ये, महान भारतीय संस्कृतीचा इतिहास, संगीत, नृत्य, खेळ, चित्रकला अशा विविध कलांची जपणूक, दैनंदिन जीवनातील कौशल्ये, स्वसंरक्षणासाठी आवश्यक असणारी शिबिरे यातून त्यांची आवड-निवड जपली जाऊन भारतीय जीवनशैलीविषयी माहिती होईल. संस्कृत प्रार्थनेबरोबरच, संवादात्मक सत्रे, विविध उपक्रम, भारतीय चालीरीती, सण, जगप्रसिद्ध महान व्यक्ती, क्रांतिकारक यांच्या कथा इत्यादींद्वारे मुलांना संस्कार वर्गात जीवन कौशल्ये शिकवली जातात. येथे प्रत्येक विचार आणि कृती मुलांच्या मनावर कायमची नोंद होते.
कौशल्य आणि ज्ञानवाढीसाठी आवश्यक…
कला, संगीत, खेळ यामुळे मुलांमधील सर्जनशीलता वाढीस लागते. त्यामुळे नवनवीन कौशल्यांचा विकास होतोच त्याचबरोबर ज्ञान वाढीसाठीही या संस्कारवर्ग शिबिरांचा मोलाचा फायदा होतो. येथील विविध उपक्रमांत मुले सहभागी होतात. यामुळे सर्वांगीण कौशल्य विकासाला चालना मिळते. मुले समाजात वावरायला शिकतात. एकमेकांशी संवाद साधायला शिकतात. यामुळे त्यांचे मन, विचार आणि बुद्धी समृद्ध व्हायला मदत होते. काही ठिकाणी पालकच विविध छंदवर्गासह, पेंटिंग्ज, बालनाट्य, संस्कार, हस्ताक्षर, संस्कार, नृत्य आणि गायन कार्यशाळा अशी विविध उन्हाळी शिबिरे आयोजित करतात.
सुरक्षेच्या दृष्टीने काळजी कशी घ्याल?
संस्कार वर्ग शिबिरे शहराबाहेर असतील. अशा वेळी मुलांना सोबत घेऊन किंवा त्यांना एकटे पाठवणार असाल तर त्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेची पुरेशी खात्री आणि चौकशी करून घ्या. शिबिरे आयोजित करणारी संस्था, प्रशिक्षक याविषयी योग्य ती चौकशी करावी. कोणत्याही जाहिरातीला बळी न पडता योग्य ती खातरजमा केल्याशिवाय मुलांना शिबिरांमध्ये घालू नका.
मुलांची आवड ओळखा…
संस्कार वर्ग व शिबिरात सहभागी होण्याआधी मुलांची आवड कशात आहे, त्यांची परिश्रम घेण्याची तयारी, इच्छाशक्ती, उदा. एखाद्या मुलाला अभिनयाची आवड असेल, तर रोज तालीम घेणे, संवाद सुधारणे, आवाजाची फेक, चेहऱ्यावरील अभिनय, मूक अभिनय, एकपात्री अभिनय या गोष्टी शिकण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यादृष्टीने मुलांना असणाऱ्या कलेची आवड कायम जपण्याच्या दृष्टीने मुलांची आवड-निवड जाणून घेणे आवश्यक आहे शिवाय विद्यार्थ्यांमधील अंगभूत गुणांना वाव कसा मिळेल, सुट्टी सार्थकी लागेल हे संस्कार वर्ग आणि शिबिरांत प्रवेश घेताना पाहावे, एकंदरीत उन्हाळी शिबिरे ही विरंगुळ्यांची ठिकाणे नसून शिक्षणाव्यतिरिक्त मुलांचे कलागुण तपासण्याची प्रयोगशाळा आहे, हाही विचार पालकांनी करावा.
उन्हाळी शिबिरे आणि संस्कार वर्ग
= दादर सार्वजनिक वाचनालय
= महावीर कुटीर को. ऑप. हौसिंग सोसायटी,
नेरूळ, सीवूड्स
= हिंदू जनजागृती समिती
= कलाकृती फाउंडेशन
= संस्कार भारतीचे उन्हाळी कला-क्रीडा शिबिर
= स्वराज्य बालवाचन कट्टा
= बालवारी आणि बालसंस्कार
= ब्रज गोपिका धाम बाल संस्कार शिबिर
काळानुसार संस्कार शिबिरांमध्ये झालेला बदल
< काही संस्कारवर्ग शिबिरांमध्ये बालकांसह पालकांनाही सहभागी करून घेतले जाते. यामध्ये आजी-आजोबांचाही सहभाग असतो. कुटुंबातील सर्व सदस्य संस्कार शिबिरांत सहभागी होऊन लहानपणीची मजा अनुभवतात. याद्वारे अनेक उपक्रम राबवले जातात.
< ही संस्कार शिबिरे सर्वच वयोगटासाठी असतात. फक्त लहान मुलांकरिता असतात, असे नाही.
< जीवनविषयक अनेक उपक्रम याद्वारे राबवले जातात.
< नित्यनेमाने श्लोक पठण शिकवले जाते. पालकही मुलांबरोबर ते म्हणतात.
< हिंदी , मराठी, इंग्लिश अशी विविध भाषांमध्ये संस्कार वर्ग व शिबिरे सुरू झाली आहेत. येथे छान छान माहिती, गोष्टी, कथा-कविता ऐकवल्या जातात.
< शिबिरात विशेषतः शैक्षणिक गोष्टींव्यतरिक्त काही छान नवीन शिकायला मिळेल यासाठीचे प्रयत्न असतात.
< बालक व कुटुंबातील इतर सर्व सदस्य यांचा छान संवाद घडावा. हा यामागचा उद्देश आहे.
< आजकाल टीव्ही, मोबाईल या माध्यमांमुळे मुलांचे मैदानी खेळ आणि अभ्यासाकडेही दुर्लक्ष होते. सध्याच्या तांत्रिक काळात ही माध्यमे वापरणेही गरजेचे झाले आहे. यांचा वापर करून अभ्यास, कलेमध्ये समन्वय कसा साधता येईल, हे मुलांना या शिबिराद्वारे शिकायला मिळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community