कोविडच्या उपचारांसाठी आपल्याजवळील विमा पॉलिसीचा लाभ कसा घ्यावा? वाचा…

कोविडमुळे बाधित असणा-या रुग्णाला आपल्या आरोग्य विम्याचा लाभ कसा मिळू शकतो, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

144

कोविडच्या दुस-या लाटेने भीषण रुप धारण केले आहे. या दुस-या लाटेत कोरोनाने बाधित झालेल्या आपल्या नातेवाईकांना, शेजा-यांना वाचवण्यासाठी प्रत्येक जण जीवाची बाजी लावत आहे. रुग्णाला औषधे, इंजेक्शन, हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी मिळण्यासाठी धडपडतो आहे. पण इतके सगळे करुन रुग्ण वाचला किंवा नाही तरी पुढे मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे या सगळ्यावर होणा-या खर्चाचा. त्यामुळे अशा वेळी रुग्णाचा जीवन विमा असेल, तर तो नक्कीच आधार ठरू शकतो. कोविडमुळे बाधित असणा-या रुग्णाला आपल्या आरोग्य विम्याचा लाभ कसा मिळू शकतो, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

कोविड-19 साठी वीमा क्लेम कसा करावा?

तुमच्या विमा पॉलिसीनुसार, समजा तुम्हाला हॉस्पिटलायझेशनची सुविधा मिळत असेल तर तुमच्या कोविडच्या उपचारांचा खर्च त्याद्वारे करण्यात येतो. फक्त उपचारांशिवाय लागणारा कोविडसाठीचा खर्च म्हणजेच, पीपीई किट, सॅनिटायझेशनचा खर्च अशा अवैद्यकीय खर्चाची या पॉलिसीद्वारे भरपाई मिळू शकत नाही. इन्श्यूरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथोरिटी(आयआरडीए)ने गृह विलगीकरणात राहून कोविडसाठी उपचार घेणा-या पॉलिसीधारकांचा खर्च कंपनीकडून देण्यात येईल, असे घोषित केले आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉटेल किंवा इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर्स मध्ये विलगीकरण कक्षात असलेल्या पॉलिसीधारकांनाही विमा सुविधांचा लाभ मिळू शकतो, असे आयआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला असणे आवश्यक आहे. खबरदारी म्हणून कोणी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विलगीकरणात राहत असेल, तर अशा व्यक्तींना पॉलिसीद्वारे खर्चासाठी क्लेम करता येणार नाही. कारण ही सुविधा केवळ आणि केवळ कोविडवरील वैद्यकीय उपचारांकरिता देण्यात आली आहे.

(हेही वाचाः को-विनवर कोविशिल्डच्या दुस-या डोसची नोंदणी करताय? मग हे आहेत नवीन ‘बदल’)

कॅशलेस उपचार

  • ज्या रुग्णालयांमध्ये पॉलिसीधारकांना कॅशलेस व्यवहार करण्याची सुविधा देण्यात आली आहे, त्या रुग्णालयांत त्यांना कॅशलेस व्यवहार करणे शक्य होणार आहे.
  • ही कॅशलेस सुविधा एका तासाच्या आत सुरू करावी. रुग्णाच्या नातेवाईकांनी इन्श्यूरन्स एजंटला किंवा थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटर(टीपीए)ला याबाबतची माहिती द्यावी.
  • त्यांच्याकडून असे करण्यास दिरंगाई होत असल्यास, त्याबाबतची तक्रार विमा कंपनीच्या अधिका-यांकडे करावी.
  • कॅशलेस उपचारांसाठीच्या यादीत जर रुग्णालयाचे नाव नसेल, तर आधी रुग्णाच्या उपचारांचा खर्च करावा लागेल आणि त्यानंतर मग विमा कंपनीकडून खर्चासाठी क्लेम करणे आवश्यक आहे.
  • विमा कंपनीकडून कॅशलेस व्यवहरांसाठी अशा नेटवर्क हॉस्पिटल्सची यादी, तुमच्या पॉलिसीसोबतच देण्यात येते. किंवा ती तुम्हाला तुमच्या एजंट, टीपीए किंवा कंपनीच्या वेबसाईटवरुन सुद्धा मिळू शकते.

एजंट किंवा टीपीएला कळवणे गरजेचे

रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना त्याबाबतची माहिती तुमच्या टीपीए किंवा एजंटला तातडीने देणे गरजेचे आहे. कारण त्यानुसार पुढील कार्यवाही जलद होण्यास मदत मिळते. तसेच पॉलिसीसोबत देण्यात आलेले कार्ड तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे, त्यामुळे प्रत्यक्ष उपचारांना तातडीने सुरुवात होण्यास मदत होते. या कार्डची स्कॅन कॉपी तुमच्याजवळ असली, तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.

(हेही वाचाः ‘कोवॅक्सिन’ बाबत भारत बायोटेककडून मोठी माहिती… ‘या’ नव्या स्ट्रेन्सवरही लस प्रभावी)

कॅशलेस सुविधा नसेल तर काय कराल?

जर तुम्ही कॅशलेस सुविधेचा वापर करत नसाल, तर हॉस्पिटलमधून रुग्णाच्या डिस्चार्जवेळी उपचारांची बिलं, पैसे भरल्याची पावती, डिस्चार्ज सर्टिफिकेट ही सगळी कागदपत्रे घ्यायला विसरू नका. तसेच प्रत्येक बिलावर रुग्णाचं नाव आहे किंवा नाही, हे सुद्धा तपासून पहा. पॉलिसीची वैधता संपली असल्यास ती रिन्यू करायला विसरू नका.

सरकारी विमा योजनांचा लाभ मिळू शकतो का?

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना या दोन विमा योजना केंद्र सरकारकडून 2015 पासून सुरू करण्यात आल्या. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी 330 रुपये आणि प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेसाठी 12 रुपये अशाप्रकारे 342 रुपये रक्कम दरवर्षी आपल्या अकाऊंटमधून वजा होत असेल, तर व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास, या योजनांद्वारे मृताच्या नातेवाईकांना लाभ मिळू शकतो. कोविडबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्या रुग्णाच्या कुटुंबियांनाही या योजनेतून लाभ मिळू शकतो, अशा बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पण पीआयबीच्या फॅक्ट चेक विंगने हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा विमा योजनेतून अशाप्रकारचा कोणताही लाभ, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना मिळणार नसल्याचे, पीआयबी फॅक्ट चेक विंगने स्पष्ट केले आहे. तसेच, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत काही ठराविक अटींच्या आधारे अशा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना योजनेचा लाभ मिळू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचाः अचानक मृत्यू झाल्यास ‘या’ सरकारी विमा योजनांमार्फत मिळू शकतो लाभ!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.