तौक्ते या चक्री वादळाने कोकण किनारपट्टीत अक्षरशः धुडगूस घातल्यावर पुढे ते मुंबईसह रायगड, पालघर जिल्ह्याला बेजार करून आता ते गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे आता कोकण किनारपट्टीत काहीसा नागरिकांनी सुटकेचे निश्वास सोडला असून आता वादळाने कोकण भागात झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. या वादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्याला मोठा फटका बसला आहे. देवगडच्या आनंदवाडी बंदरात नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या. यात एका खलाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण बेपत्ता झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा ठप्प!
वादळामुळे बुडालेल्या बोटीतील राजाराम कृष्णा कदम या खालशाचा मृत्यू झाला, तर दिनानाथ जोशी, नंदकुमार नार्वेकर, प्रकाश गिरीद हे खलाशी बेपत्ता आहेत. तौत्के चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसल्याचे पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवा बंद होती. वादळामुळे जवळपास 80 टक्के विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीज सेवा खंडीत झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोबाईल टॉवरही कोसलळे आहेत. त्यामुळे मोबाईल सेवाही विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अशावेळी प्रशासनाने आधीच खबरदारी घेत कोरोना रुग्णांसाठी योग्य उपाययोजना केल्याचे दिसून आले. चक्रीवादळाचा इशारा आधीच मिळाल्यामुळे प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. वीज गेली तर कोरोना रुग्णांच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी कोविड रुग्णालयांमध्ये जनरेटरची सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे वादळाच्या तडाख्यात बत्ती गुल झाली असली तरी कोरोना रुग्णालयातील वीज सुरु आहे.
(हेही वाचा : तौक्ते वादळ! आता गुजरातकडे लक्ष, वायू दल सज्ज! )
उरणमध्ये 2 महिलांचा मृत्यू
उरण परिसरात एक भिंत पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. उरणच्या बाजारपेठेत भिंत पडल्याने भाजी विक्री करणारी महिला निता भालचंद्र नाईक आणि सुनंदाबाई भालचंद्र घरत यांचा मृत्यू झाला आहे. तर 800 पेक्षा जास्त घरांना आणि पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
६ जण ठार!
या चक्रीवादळामुळे २ हजार ५४२ घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १,७८४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा ६ अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे. ठाणे २, रायगड ३, सिंधुदुर्ग १ असे ६ जण मरण पावले आहेत. मुंबईत ४, रायगड आणि रत्नागिरीत प्रत्येकी २ आणि ठाण्यात १ व्यक्ती जखमी आहे. रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी २ अशी ४ जनावरे मरण पावली आहेत.
चक्रीवादळ रात्री ११ पर्यंत गुजरातेत धडकेल!
मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सातत्याने माहिती घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ कृष्णानंद होसाळीकर यांच्याशीही चर्चा केली. सायंकाळी 5 वाजेच्या स्थितीनुसार हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून समुद्रात १८० किमी दूर असून दिवसभर असणारा वाऱ्याचा वेगही हळूहळू कमी होऊन ७० ते ८० किमी प्रती तास इतका होईल, पुढे तो आणखी ओसरेल असे त्यांनी सांगितले. हे चक्रीवादळ रात्री ८ ते ११ पर्यंत गुजरातेत धडकेल. त्यावेळी तेथील वाऱ्याचा वेग हा पावणे दोनशी किमी प्रती तास इतका असू शकतो. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागेल, असेही त्यांनी सांगितले. गेल्या ६ तासांत मुंबई उपनगरात १२० मिमी पेक्षा जास्त तर कुलाबा भागात १०० ते १२० मिमी पाउस झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत ३ कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे तसेच मुंबईत पडलेली झाडे व खांब काढण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे अशी माहिती बृहन्मुंबई पालिकेने दिली. चक्रीवादळामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली, तसेच रेल्वे वाहतुकीवर झालेल्या परिणामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांकडून घेतली.
(हेही वाचा : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रचंड नुकसान! साडेतीन लाख वीज कनेक्शन बंद!)
खासदार सुरेश प्रभूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
दरम्यान राज्यसभेचे खासदार सुरेश प्रभू यांनी तौक्ते वादळाने कोकण किनारपट्टीचे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने पत्र लिहून अवगत केले. या पत्रात खासदार प्रभू म्हणाले कि, या वादळाने कोकणच्या ७२० किनारपट्टीत अतिशय नुकसान झाले आहे. आधीच कोरोनामुळे अर्थचक्र थांबलेले असताना वादळाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये घरे, गुरांचे गोठे यांच्यावर झाडे पडली, कौलाचे छत उडून गेली. दुकाने, इमारतींच्या गच्चीवरील पत्र्याचे शेड उडून गेल्या. यांना तातडीने मदत झाली पाहिजे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये समुद्राचे पाणी मिसळल्याने ते स्रोत दूषित झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. माड, पोफळी, हापूस कलमे, काजूच्या बागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आजवर कधीही झाले नाही इतके वीज वितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान पाहता तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी खासदार सुरेश प्रभू यांनी केली.
Join Our WhatsApp Community