- ऋजुता लुकतुके
सलग तीन पराभवांमुळे गुणतालिकेत पार ढेपाळलेल्या मुंबई इंडियन्स संघाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. ताजी कुमक म्हणून टी-२० स्पेशालिस्ट फलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आयपीएलमध्ये खेळायला सिद्ध झाला आहे. सगळं सुरळीत झालं तर तो ७ एप्रिल किंवा ११ एप्रिलचा सामना खेळू शकेल. आतापर्यंतच्या महत्त्वाच्या तंदुरुस्तीच्या चाचण्या त्याने पार केल्याचं समजतंय.
सध्या तो बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीतच आहे. आणि स्पोर्ट्स हार्निया तसंच घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर तो तिथे तंदुरुस्तीसाठी सराव करत आहे. दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेनंतर तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. पण, या हंगामातील त्याचा फॉर्म असा होता की, टी-२० प्रकारात सर्वाधिक ५ शतकं त्याने झळकावली आहेत. आणि ४ महिने क्रिकेटपासून दूर असला तरी फलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल स्थान त्याने कायम राखलं आहे. इतर फलंदाजांच्या तुलनेत तो इतका पुढे आहे. (IPL 2024)
(हेही वाचा – IPL 2024, Siddhartha Dismisses Kohli : कोहलीला बाद करशील का? या प्रश्नावर तो ‘हो’ म्हणाला आणि…)
‘रिटर्न टू क्रिकेट नावाची एक परीक्षा खेळाडूंना पार पाडावी लागते. तर त्यांना दुखापतीनंतर मैदानावर परतण्यासाठी प्रमाणपत्र दिलं जातं. या प्रमाणपत्रासाठी आवश्यक ९९ टक्के चाचण्या सुर्यकुमारने पूर्ण केल्या आहेत. फक्त एकच शेवटची चाचणी बाकी आहे. ती झाली की, सुर्या मैदानावर पुनरागमन करू शकतो,’ असं बंगळुरूतील क्रिकेट अकादमीतील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ ७ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करणार आहे. तर संघाचा त्यानंतरचा सामना ११ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर होणार आहे. हे दोन्ही सामने घरच्या मैदानावर होणार आहेत. गुरुवारी संध्याकाळपर्यंत सुर्यकुमारच्या उर्वरित तंदुरुस्ती चाचणीवरील निकाल स्पष्ट होईल. आणि त्यानंतर तो हे सामने खेळू शकेल की नाही, याचाही निर्णय होईल. सुर्यकुमार ऐवजी सध्या पंजाबचा फलंदाज नमन धीर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. आणि त्याला म्हणावा तसा जम बसवता आलेला नाही. (IPL 2024)
सुर्यकुमारच्या (Suryakumar Yadav) समावेशामुळे मुंबई संघाला नक्कीच दिलासा मिळेल. कारण, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पैकी राजस्थान विरुद्ध तर संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १२५ धावाच करू शकला. अशावेळी फलंदाजीत सुर्यकुमारची उणीव संघाला नक्कीच जाणवली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community