कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. यातून होणारा संसर्ग जीवघेणा ठरत आहे. त्याचा मुंबईतील पहिला बळी केईएम रुग्णालयात झाला आहे. हा रुग्ण ३६ वर्षांचा होता, त्याला सह्व्याधीही होत्या.
म्युकरमायकोसिसचा विशेष कक्ष उभारणार!
मुंबईत म्युकरमायकोसिसची एकूण रुग्ण संख्या ही १५० वर पोहचली आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या केईएम, नायर, शीव, कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या कोरोनाबाधित ज्या रुग्णांची स्थिती नाजूक असेल त्यांचा जीव वाचवण्यासाठी स्टिरॉइड, टोसिलीझुमॅबचा या औषधांचा वापर केला जात आहे. मात्र यातून रुग्ण बरे होतात, मात्र त्यांना पुढे म्युकरमायकोसिसची लागण होऊन दुसऱ्या जीवघेण्या रोगाची लागण होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या बुरशीजन्य रोगांमुळे डोळे, नाक आणि मेंदूवर हल्ला होतो तसेच जिवालाही धोका निर्माण होता आहे. आधीच कोरोनाग्रस्त रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, त्यात त्यांना कॅन्सर, मूत्रपिंड विकार, मधुमेह, बोन मॅरो डिप्रेशन, थॅलेसेमिया यांपैकी कोणतीही सह्व्याधी असेल, तर त्यांना या आजाराचा धोका जास्त असतो. प्रसंगी ऑपरेशन करावे लागते. अशा धोकादायक आजाराचे मुंबईत सध्या रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महापालिकने ‘म्युकरमायकोसिस’ला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी प्रमुख चारही रुग्णालयांसह सहा जम्बो कोविड सेंटरमध्ये ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरू करण्यात आली आहे. तर लवकरच स्पेशल म्युकरमायकोसिस वॉर्ड आणि ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
(हेही वाचा :आता म्युकरमायकोसिसच्या औषधाचा काळाबाजार?)
सहा जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया
डोळ्यांसह नाक आणि मेंदूवर म्युकरमायकोसिस वेगाने परिणाम होतो. डोळ्यांत संसर्ग वाढल्यास डोळे गमावण्याची वेळ येते. त्यामुळे महापालिकेच्या केईएम रुग्णालयात आतापर्यंत सहा जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून संसर्ग काढून टाकण्यात आले आहे. केईएममध्ये सध्या 60 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असून आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
म्युकरमायकोसिसच्या (ब्लॅक फंगस) म्हणजे काय?
- म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग ‘म्युकोरेल्स’ या फंगसमुळे होतो.
- कोविडच्या उपचारानंतर काही रुग्णांमध्ये याचा संसर्ग दिसून येत आहे.
- कोविडमुळे व मधुमेह किंवा इतर सहव्याधींमुळे, तसेच उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते या संधीचा फायदा बुरशी [फंगस] घेते व या रोगाला सुरुवात हाेते.
- नाकाच्या मार्गे ही बुरशी नाकामागच्या सायनसमध्ये, तोंडामध्ये विशेषत: वरच्या जबड्यात व दातात, डोळ्यापासून ते मेंदूपर्यंत पोहचते.
- या बुरशीचा पसराव अति वेगाने असून उपचारासाठी खुपच कमी वेळ मिळतो.
- लवकर निदान झाले तर औषोधोपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो, पण उशीर झाला, तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते.
- कोरोनासोबत ‘हे’ रोग असल्यास म्युकरमायकोसिसची लागण लवकर होतेमधुमेह/डायबिटीज, HIV / AIDS, जास्त वेळ व मात्रामध्ये स्टिरॉइडचा वापर, ब्लड प्रेशर, विविध कँसर, लिव्हर सिरोसिस, अति लठ्ठपणा
निदान करण्यासाठी लक्षणे
- तोंड व दांत चेहर्यावर सूज येणे, तोंडातून दुर्गंधी येणे, तोंडातून पू येणे, हिरड्यांवर फोड़ किवा सूज येणे, अचानक दात हालणे व पडणे, दातांची जखम न भरणे.
- नाक – सर्दी असणे, नाक बंद असणे, साइनसच्या जागेत दुखणे, नाकातून रक्त येणे, नाक दुखणे
- डोळे – डोळे दुखणे व सुजणे, डोळ्यांनी कमी दिसणे/ न दिसणे
- मेंदू – डोके दुखणे, मेंदूच्या नसांचा त्रास होणे