महागाईच्या विरोधात पिंपरीत राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन!

पेट्रोलचे दर शंभर रुपयांवर गेलेले आहेत. त्यात भाजप सरकारने जनसामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. संकटाच्या घडीला खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केले आहे.

136

कोरोना महामारीच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या देशवासियांना पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून आणखी संकटाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. इंधन, गॅस दरवाढीसोबत खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने देशातील शेतक-यांचेही कंबरडे मोडले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी सोमवारी, १७ मे रोजी महागाईच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात केलेल्या आंदोलनात केली.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, अजित गव्हाणे, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

(हेही वाचा : प्रताप सरनाईक गायब! किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप )

खतांच्या किंमतीही वाढल्या!

पुढे बोलताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले, भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. गॅसचे दर सातत्याने वाढविले जात आहे. कोरोना संकटाचा परिणाम उद्योग, धंदे, व्यावसायावर झालेला आहे. या परस्थितीत केंद्रातील सरकारने नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. परंतु, केंद्रातील सरकार इंधन, गॅस दरवाढ करून जनतेला आणखी संकटात टाकण्याचे काम करत आहे. पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्यावर गेलेले आहेत. केंद्र सरकारने म्हणजेच देशातील भाजप सरकारने जनसामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. संकटाच्या घडीला खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम भारत सरकारने केले आहे. १०.२६.२६ खतांची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या 

डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी ११८५ रुपयांना होता. तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ चे पन्नास किलोंचे पोते १,१७५ रुपयांचे होते ते आता १,७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप भाजप सरकारने केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.