शिवसेना (Shivsena) ठाकरे गटात नाराज असलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी अखेर शनिवार, ६ एप्रिल रोजी शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. दोन महिन्यांपूर्वीच बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला होता. मात्र ठाकरेंकडून कुठलेही उत्तर न आल्याने त्यांनी अखेर शिंदे गटाची वाट निवडली. बबनराव घोलप यांच्यासह माजी आमदार संजय पवार यांनीदेखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला.
पक्ष प्रवेशानंतर बबनराव घोलप म्हणाले की, आज माझा शिवसेनेत प्रवेश होत आहे. मी मागची 54 वर्षे बाळासाहेब यांचा शिवसैनिक म्हणून काम केले आहे. ठाकरे गटाकडून माझ्यावर अन्याय झाला आहे. मला संपर्कप्रमुख पदावरून काढण्यात आले. तिथे काहीतरी काळबेर झाले, असे म्हणता येईल. त्यामुळे मी उपनेते पदाचा राजीनामा दिला, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. एकनाथ शिंदे हे गोरगरिबांचे काम करतात. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत राहणं गरजेचे आहे. मध्यंतरी मी समाजाचे काही प्रश्न मांडले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मी 25 वर्षे आमदार राहिलो आहे. माझ्याकडे महाराष्ट्राची माहिती आहे. त्यामुळे मला राज्यातील जी जबाबदारी देतील ती मी पार पाडेन, असे यावेळी बबनराव घोलप यांनी सांगितले. (Shivsena)
थोडा आधी पक्षप्रवेश व्हायला हवा होता – एकनाथ शिंदे
चर्मकार बांधव भगिनींचा उद्धार कसा होईल याची जबाबदारी मी त्यांना देतो. चर्मकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करायचं आहे. असा कोणताही घटक नाही की सरकारने काही केलं नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्य, केंद्राने केलेलं काम आपण लोकांसमोर मांडलं आहे. थोडा आधी हा पक्षप्रवेश व्हायला हवा होता पण, देर आये दुरुस्त आये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community