रवी शंकर (Ravi Shankar) यांचा जन्म ७ एप्रिल १९२० साली बनारस म्हणजे आताच्या वाराणसी येथे एका बंगाली हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्याम शंकर चौधरी हे प्रतिष्ठित वकील आणि राजकारणी होते. त्यांनी राजस्थान येथील झलवार येथे दिवाण म्हणजेच पंतप्रधान म्हणून अनेक वर्ष काम सांभाळलं. त्यांची आई हेमांगीनी देवी ही एका श्रीमंत सावकाराची मुलगी होती. रवी शंकर यांचे वडील लंडन येथे वकिलीची प्रॅक्टिस करायला गेले. तिथे त्यांनी दुसरं लग्न केलं. इथे रवी शंकर यांच्या आईने आपल्या मुलांचा एकटीनेच सांभाळ केला.
वयाच्या तेराव्या वर्षी रवी शंकर (Ravi Shankar) हे आपल्या मोठ्या भावाच्या डान्स ग्रुपबरोबर फ्रान्समध्ये पॅरिस येथे गेले. त्या ग्रुपमध्ये राहून ते डान्स आणि वेगवेगळी भारतीय वाद्ये वाजवायला शिकले. १९३० सालापर्यंत रवी शंकर हे आपल्या भावाच्या ग्रुपबरोबर मध्य युरोप आणि युनायटेड स्टेट्स येथे फिरले. त्यादरम्यान त्यांनी फ्रेंच ही भाषा शिकून घेतली. त्याचबरोबर पाश्चात्य संगीत, सिनेमा, रूढी आणि परंपरा यांना समजून घेण्याचाही प्रयत्न केला.
रवी शंकर (Ravi Shankar) हे त्यांच्या युरोप दौऱ्यावर असतानाच त्यांचे आई-वडील गेले. त्याच काळात दुसऱ्या महायुद्धाची शक्यता वाढल्यामुळे पश्चिमेला पुन्हा दौरा करणे शक्य नव्हते. म्हणून रवी शंकर हे राजस्थान येथील संस्थानिकांच्या दरबारात प्रमुख वादक असलेल्या खान यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने संगीत शिकायला राहिले. खान हे अतिशय कठोर शिक्षक होते. सर्वात आधी रवी शंकर यांनी सतार आणि सुरबहार ही वाद्ये वाजवायला शिकून घेतले. याव्यतिरिक्त त्यांनी रुद्राविणा, रुबाब आणि सुरसिंगार या वाद्यांचे तंत्रही शिकून घेतले. तसेच धृपद, धामर आणि ख्याल या संगीतशैली शिकून घेतल्या.
१९३९ सालापासून रवी शंकर (Ravi Shankar) यांनी सतारवादनाचे सादरीकरण करायला सुरूवात केली. त्यांनी सतारवादानामध्ये वेगवेगळ्या शैली निर्माण केल्या. त्यांच्या संगीतातल्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले होते. त्यांपैकी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, कालिदास पुरस्कार, संगीत अकॅडमी अवॉर्ड हे आहेत.