मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या केवळ १८ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा २७ जुलै २०२१ पर्यंत पुरेल इतकाच असून, मागील वर्षी याच कालावधीत २१ टक्के एवढा पाणीसाठा होता. तर त्याआधी म्हणजे २०१९ मध्ये हा पाणी साठा १३ टक्के एवढाच होता.
किती दिवस पुरणार साठा?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांतून दररोज ३८०० दशलक्ष (३८० कोटी) लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. या सर्व धरणांमधून वर्षाला १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. त्यातील सध्या केवळ २ लाख ६१ हजार ९७८ दशलक्ष लिटर एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे हा साठा पुढील ६८ दिवस पुरेल इतकाच आहे.
तर होऊ शकते कपात
पुढील काही दिवसांमध्ये पाऊस चांगल्याप्रकारे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३० जूनपर्यंत पाण्याची पातळी सुस्थितीत असल्यास कोणत्याही प्रकारच्या पाणी कपातीचे संकट मुंबईकरांवर येणार नाही. मात्र, पाऊस पडूनही तलावातील पाणी पातळीत समाधानकारक वाढ न झाल्यास, मुंबईकरांना कपातीचा सामना करावा लागू शकतो.
सन २०२१ : २ लाख ६१ हजार ९७८ दशलक्ष लिटर( १८.१० टक्के)
सन २०२० : ३ लाख १४ हजार ४२३ दशलक्ष लिटर (२१.७२ टक्के)
सन २०१९ : १ लाख ८८ हजार ७१३ दशलक्ष लिटर (१३.०४ टक्के)
Join Our WhatsApp Community