Raj Thackeray : नरेंद्र मोदींसाठी राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; विधानसभेसाठी कामाला लागण्याचे मनसैनिकांना आवाहन 

ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. आपण देशाला खड्ड्यात टाकणार कि देशाची प्रगती करणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

199

दिल्लीतून परतल्यावर मी स्पष्ट सांगितले मला या वाटाघाटीत पाडू नका, मला राज्यसभा नको आणि विधानपरिषदही नको, पण आज या देशाला चांगल्या आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी माझ्या काही अपेक्षा आहेत, त्या जर पूर्ण झाल्या नाही तर हे राज ठाकरेंचे तोंड आहे. मी तेव्हाही बोलेन. पण आता केवळ नरेंद्र मोदींसाठी महायुतीला लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील  गुढी पाडवा मेळाव्यात मंगळवारी केली. पण त्याचवेळी त्यांनी आतापासूनच विधानसभेच्या तयारीला लागा, जोरदार तयारी सुरु करा. पुढचे पुढे बघू, असे मनसैनिकांना सांगत उद्या माझ्या या भूमिकेवर कुणी पकपक सुरू केली तर माझ्या तोंडाची दारे खिडक्या उघडायला मी तयार आहे, असा इशाराही मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला. शिवाजी पार्क येथे ९ एप्रिल रोजी झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा… 

२००६ साली जेव्हा मी मनसेची स्थापना केल्यावर पहिले भाषण केले होते, तेव्हा मी ‘महाराष्ट्रातील शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला मला पाहायचा आहे, असे म्हटले होते. आज जगभरात भारत हा सगळ्यात तरुण देश आहे. त्यांना चांगल्या शिक्षण, तंत्रज्ञान आणि नोकऱ्यांची गरज आहे. १० वर्षानंतर हा देश पुन्हा वयस्क होणार आहे. पंतप्रधान मोदींकडे अपेक्षा आहे. सगळे सोडा तरुणांकडे लक्ष द्या. प्रत्येक देशाचा हा काळ येतो. जपानचा जेव्हा असा काळ आला होता, तेव्हा त्या काळात तिथे सोनी, होंडा कंपन्या उभ्या राहिल्या, देश घुसळून निघाला. आज बघा जपान कुठे जाऊन पोहचला आहे. तसा हा देशही घुसळून निघाला पाहिजे, जर तसे घडले नाही तर अराजक निर्माण होईल. लोकसभेत ६ लाख उद्योगपती देश सोडून गेल्याचे सांगण्यात आले. हे चांगले नाही. जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाही, तर अराजक माजेल, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा ‘मुस्लिम तुष्टीकरण’ छाप Congress च्या जाहिरनाम्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा)

हे निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी 

महाराष्ट्र सर्वाधिक कर भरतो, त्यामुळे महाराष्ट्राला सर्वाधिक साहाय्याची अपेक्षा आहे. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. आपण देशाला खड्ड्यात टाकणार की देशाची प्रगती करणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आज हाणामाऱ्या सुरु आहेत, पुढची निवडणूक होईल तेव्हा काय होईल? महाराष्ट्राच्या राजकारणाचा कॅरम चुकीचा फुटला आहे, कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत हे कळत नाही, अशी महाराष्ट्राची अवस्था झाली आहे, यातून मार्ग काढायचा आहे. महाराष्ट्राच्या मतदारांनी व्यभिचाराला राजमान्यता देऊ नये. अन्यथा पुढचे दिवस भीषण आहेत, असा इशाराही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.