रमजान महिन्यात मुंबईत जागोजागी भिकाऱ्यांची संख्या वाढलेली दिसत आहे. विशेषतः जिथे जिथे मुस्लिम बहुल ठिकाणे आहेत, तिथे या भिकाऱ्यांची (Beggars) संख्या वाढली आहे. त्याठिकाणी भिकाऱ्यांचे जथ्येच्या जथ्ये आलेले आहेत. ही संख्या पद्धतशीरपणे वाढवण्यात आली आहे. भिकाऱ्यांच्या माध्यमातून पैसे गोळा करणाऱ्यांची टोळी यामागे सक्रिय आहे. दुपारच्या वेळेस एलबीएस रोड या ठिकाणी एका वाहनातून २५ ते ३० भिकाऱ्यांना उतरवले जाते, त्यानंतर हे भिकारी ठरलेल्या ठिकाणी भीक मागण्यासाठी रवाना होतात. तर काही भिकारी (Beggars) एलबीएस मार्ग येथून रस्त्यावर लोळत लोळत रेल्वे स्थानक, बाजारपेठापर्यंत भीक मागताना दिसतात. एक भिकारी रमजान (Ramzan) महिन्यात दिवसाला ५ ते ६ हजार रुपयांची कमाई करतो व ईदच्या आदल्या दिवशी (चांद रात) आणि ईदच्या दिवशी १० ते १५ हजार रुपयांपर्यत कमाई करतात अशी माहिती कुर्ल्यातील काही दुकानदार आणि फेरीवाले यांनी दिली.
कुर्ला पश्चिम, माहीम, जोगेश्वरी बेहराम बाग, गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द, त्याच बरोबर दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोड, इत्यादी परिसरात महाराष्ट्रातील तसेच इतर वेगवेगळ्या राज्यातून भीक मागण्यासाठी भिकाऱ्यांचे जथ्ये आलेले आहेत. अनेक वेळा हे भिकारी (Beggars) या दुकानदाराना सुट्टे पैसे देऊन नोटा घेत असल्यामुळे या भिकाऱ्याची दिवसाच्या कमाईची माहिती मिळत असते असे कुर्ल्यातील एका दुकानदाराने सांगितले. रमजान (Ramzan) महिना ते ईदपर्यंत एकट्या मुंबईत या भिकाऱ्यांची कोट्यवधींची उलाढाल असते, अशी एका माहितगाराने माहिती दिली.
मुस्लिम धार्मिक स्थळांजवळ भिकाऱ्यांच्या टोळ्या
रस्त्यावर भीक मागणारी व्यक्ती दिवसाला जास्तीत जास्त किती कमाई करू शकते? हा प्रश्न अनेकांना पडतो, भिकाऱ्याच्या कमाईबाबत अनेक वेळा वृत्तपत्रांनी लिहिले आहे, भिकाऱ्याच्या जीवनावर अनेक ‘ट्रॅफिक सिग्नल’ सारखे चित्रपट येऊन गेले आहेत. अनेकांना भिकाऱ्याच्या (Beggars) कमाईबाबत उत्सुकता असते. शहरामध्ये अनेक प्रकारचे भिकारी बघायला मिळतात, लहान मुलांना कडेवर घेऊन भीक मागणाऱ्या महिलांपासून रस्त्यावर लोळून भीक मागणाऱ्या विकलांग भिकाऱ्यांपर्यंत भिकारी बघायला मिळतात, सणासुदीत भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची टोळी वेगळी असते. सणासुदीत भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांच्या टोळ्या या वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राज्यातून मोठमोठ्या शहरात येत असतात आणि कोट्यवधीची कमाई करून जातात. गणेशोत्सव, रमजान ईद (Ramzan), दिवाळी यासारख्या सण उत्सवात या टोळ्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या महानगरामध्ये बघायला मिळतात. सध्या या टोळ्यांचे सर्वाधिक जथ्ये मुंबईमध्ये आल्याचे दिसून येत आहे. रमजानच्या (Ramzan) महिन्यात मुंबईतील मुस्लिम धार्मिक स्थळांजवळ भिकाऱ्यांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या टोळ्यांमध्ये महिला, विकलांग व्यक्ती, लहान मुले, तसेच वयोवृद्ध भिकाऱ्यांचा (Beggars) मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे आढळून येते. मुंबईतील मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये यंदाच्या रमजान महिण्यात मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community