महायुतीच्या जागावाटपात भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्षांना डोकेदुखी बनलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) जागेचा तिढा लवकरच सुटेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे. बुधवारी सकाळी किरण सामंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होती. या पार्श्वभूमीवर किरण सामंत यांना मुख्यमंत्र्यांकडून मुंबईत बोलावले जाणे, महत्त्वाची बाब मानली जात आहे.
(हेही वाचा Election Duty टाळणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणारच; निवडणूक आयोग उच्च न्यायालयात काय म्हणाले?)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी भाजपा आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. भाजपाकडून नारायण राणे यांनी आक्रमकपणे या जागेवर दावा सांगितला आहे. तर शिंदे गटाकडून हा शिवसेनेचा मतदारसंघ असल्याचे सांगितले जात आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे किरण सामंत लढण्यासाठी इच्छूक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गातून लढण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र, भाजपा ही जागा शिंदे गटाला सोडायला तयार नाही. अशातच आता भाजपाकडून कोणत्याही क्षणी नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना तातडीने मुंबईत बोलावून घेतल्याची चर्चा आहे. आता एकनाथ शिंदे हे किरण सामंत यांना काय सूचना देतात, हे पाहावे लागेल. भाजपाने नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गातून उमेदवारी जाहीर केल्यास किरण सामंत काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. भाजपा आणि शिंदे गटात मुंबई उत्तर-मध्य, मुंबई उत्तर-पश्चिम, ठाणे, नाशिक, पालघर, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि दक्षिण मुंबई या नऊ मतदारसंघांमुळे जागावाटप (Lok Sabha Election 2024) अर्धवट राहिले आहे.
Join Our WhatsApp Community