Dr. Sanjay Kulkarni : रुग्णांना वेदनांपासून मुक्त करणारे जगप्रसिद्ध युरोसर्जन डॉ. संजय कुलकर्णी

युरॉलॉजी क्षेत्रात नवीन पद्धत विकसित केल्याबद्दल सन २०१६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते डॉ. संजय कुलकर्णी यांचा 'डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार' हा भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित, नोबेलच्या तोडीचा समजला जाणारा सर्वोच्च मानाचा पुरस्कार देऊन सन्मान केला गेला.

439
मूत्रविकारांशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करणारे प्रख्यात युरोसर्जन डॉ. संजय कुलकर्णी.
  • राधिका कुलकर्णी
रुग्णांना नवजीवन देणारी डॉक्टरव्यक्ती ही पृथ्वीवरील देवदूतच म्हटली जाते. असेच एक डॉक्टर म्हणजे जगप्रसिद्ध युरोसर्जन डॉ. संजय बळवंत कुलकर्णी.  १२ एप्रिल १९५३ रोजी विजया आणि बळवंत या माता-पित्याच्या पोटी जन्मलेले डॉ. संजय कुलकर्णी (Dr. Sanjay Kulkarni) हे मूत्रविकारांशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांवर सर्वोतम उपचार करणारे प्रख्यात युरोसर्जन म्हणून ओळखले जातात.

‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कारा’चे मानकरी, ‘युरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष आणि इतर मानसन्मान

युरॉलॉजी क्षेत्रात नवीन पद्धत विकसित केल्याबद्दल सन २०१६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते डॉ. संजय कुलकर्णी (Dr. Sanjay Kulkarni) यांचा ‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’ हा भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित, नोबेलच्या तोडीचा समजला जाणारा सर्वोच्च मानाचा पुरस्कार देऊन सन्मान केला गेला. सध्या ते ‘युरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष आहेत. ‘सोसायटी इंटरनॅशनल डी युरॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय युरॉलॉजी सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. सन २०११ मध्ये ‘युरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’ने डॉ. संजय यांना प्रेसिडेंट्‌स गोल्ड मेडल देऊन गौरविले. सन २०१४ मध्ये त्यांची जेनिटो युरीनरी रीकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन सोसायटीचे (GURS) अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि ७-९ सप्टेंबर २०२३ दरम्यान अमेरिकेत सीअॅटलमध्ये GURS ने त्यांना लाइ‌फटाइम अचिव्हमेन्ट अॅवॉर्ड देऊन गौरविले. सन २०१७ मध्ये त्यांना इंग्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले आणि ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ युरॉलॉजिकल सर्जन्स’ आणि ‘युरॉलॉजी सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड’ या संस्थांचेही ते मानद सदस्य झाले. नुकतेच म्हणजे 15 फेब्रुवारीला त्यांना ‘बोस्टन सायंटिफिक इनोव्हेशन सेंटर’च्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
डॉ. संजय कुलकर्णी (Dr. Sanjay Kulkarni) यांनी शोधून काढलेली कुलकर्णीज् युरेथ्रोप्लास्टी जगन्मान्य आहेच. शिवाय अमेरिकेच्या पाठ्यपुस्तकात ‘हिनमन्स अॅटलास ऑफ युरॉलॉजी’मध्ये ती समाविष्ट असून तिथे शिकवलीही जाते. या सर्वात मुकुटमणी शोभावा असे कार्य म्हणजे सर्जरीत जे बायबल समजले जाते त्या ‘लव्ह अँड बेली प्रॅक्टिस ऑफ सर्जरी’च्या सन २०२२च्या आवृत्तीत ‘युरेथ्रा अँड पेनिस’ या विषयावर डॉ. संजय कुलकर्णींनी (Dr. Sanjay Kulkarni) एक चॅप्टर लिहिला आहे. या बरोबरच जगातील इतर असंख्य मानसन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.

अध्ययन – अध्यापन

डॉ. संजय यांनी भारतातून एम.एस. पदवी घेतल्यानंतर लंडनमध्ये युरॉलॉजी विषयात डिप्लोमा, ग्लासगोत एफ आर सी एस, लंडनमध्ये मानद एफ आर सी एस असे शिक्षण घेतले आहे. इंग्लंडमध्ये युरॉलॉजीचे प्रशिक्षण घेताना युरेथ्रल रीकन्स्ट्रक्शनचे जनक रीचर्ड टर्नर वॉरविक यांच्याकडून डॉ. संजय यांनी प्रशिक्षण घेतले. आजवर डॉ. संजय यांनी 52 हून अधिक देशांमध्ये युरॉलॉजीचे शिक्षण घेणाऱ्या किंवा घेतलेल्या डॉक्टरांना स्वत: शोधून काढलेल्या पद्धतींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले आहे. कुलकर्णीज् स्कूल ऑफ युरेथ्रल सर्जरीद्वारे देश-विदेशातील युरॉलॉजिस्टना डॉ. संजय (Dr. Sanjay Kulkarni) दर महिन्यातील एका शनिवार-रविवारी पुण्यातील स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनच्या प्रात्यक्षिकाद्वारे मोफत प्रशिक्षण देत असतात. विविध कार्यशाळा, परिषदांमधूनही हे ज्ञानदान व ज्ञानप्रसार अखंड चालूच आहे.
डॉ. संजय कुलकर्णी व त्यांची पत्नी, जगातील पहिली महिला लॅपरॉस्कॉपिक सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी या दाम्पत्याने १ जानेवारी २०२३ रोजी ‘युरोकुल’ हे युरोनेफ्रॉलॉजीचे सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा रुग्णांना व्हावा म्हणून डी.पी. म्हैसकर फौंडेशनने दिलेल्या देणगीतून त्यांच्याच नावाने १५ सप्टेंबर २०२३ रोजी ‘रोबोटिक युरॉलॉजी सेंटर’ही सुरू केले. डिसेंबर २०२३ मध्ये शस्त्रक्रियेविना प्रोस्टेट ग्रंथींवर उपचार करणाऱ्या ‘रिझूम थेरपी’ या यंत्र-तंत्रज्ञानाचा वापर भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये सुरू झाला. तरुण रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होईल असे डॉ. संजय कुलकर्णी सांगतात. याच वर्षाच्या सुरुवातीला १५ जानेवारी २०२४ रोजी या हॉस्पिटलमध्ये पहिली किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. एखाद्या रुग्णाकडे पैसे नाहीत म्हणून त्याच्यावर इलाज करायला डॉ. संजय व डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णींच्या हॉस्पिटलमध्ये कधीही नकार मिळत नाही. रुग्ण कितीही गरीब असो, त्याच्यावरही जगातील सर्वोत्तम उपचारच केले जातात. जगभरात तरुण सर्जन्सची पिढी घडवणारे आणि वैद्यकीय व्यवसाय उदात्त भावनेने करणारे असे हे जगप्रसिद्ध युरोसर्जन डॉ. संजय कुलकर्णी!

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.