अजोय मेहता… राज्याचे माजी मुख्य सचिव आणि सध्याचे महारेराचे अध्यक्ष. महारेराचे अध्यक्ष झाल्यानंतरही अजोय मेहता यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालय मेहरबान असल्याची बातमी सर्वात आधी हिंदुस्थान पोस्टने दिली होती. २३ फेब्रुवारी रोजी मेहतांच्या नावाच्या पाटीसह हिंदुस्थान पोस्टने बातमी दिली होती. मात्र आता तब्बल ३ महिन्यांनंतर ठाकरे सरकारला त्यांच्या नावाची प्रधान सल्लागार ही पाटी काढण्याची उपरती सुचली असून, नुकतीच ही पाटी हटवण्यात आली आहे. त्यामुळे महारेराचे अध्यक्ष होऊन तीन महिने उलटले, तरी अजोय मेहता यांची मुख्यमंत्री कार्यालयात लुडबुड सुरू होती की काय? असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
टीकेनंतर मेहतांच्या नावाची पाटी हटवली
हिंदुस्थान पोस्टने फेब्रुवारी महिन्यातच हे वृत्त दिले होते. त्यानंतर काही वृत्तपत्रांनी देखील तशाच आशयाचे वृत्त प्रसारित केले. मात्र आता चहुबाजूने होणाऱ्या टीकेनंतर आता मेहतांच्या नावाची पाटी गायब झाली आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांनी देखील याबाबत खासगीत नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही तर मेहता जरी महारेराचे अध्यक्ष झाले असले, तरी त्यांचा मुख्यमंत्री कार्यालयातील वावर सुरू असल्याने काही अधिकारी देखील नाराज झाले होते. अजोय मेहता यांनी महारेराच्या अध्यक्षपदासाठी देखील लॉबिंग केली होती. मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असल्याने, त्यांची या पदावर नियुक्ती झाल्याची कुजबुज अधिकाऱ्यांमध्ये होती.
(हेही वाचाः मुख्यमंत्री अजूनही मेहतांवर ‘मेहरबान’?)
कोण आहेत अजोय मेहता
- अजोय मेहता हे १९८४च्या बॅचचे आय.ए.एस अधिकारी आहेत.
- धुळ्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी(प्रोबशनरी) म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात झाली.
- त्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी अहमदनगर, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक महापालिकेचे आयुक्त, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेचे सहआयुक्त(सुधार), केंद्र सरकारचे फलोत्पादन विभागाचे संचालक, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी(महानिर्मिती)चे व्यवस्थापकीय संचालक.
- महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, पुनर्ररचित रत्नागिरी वायू व वीज मंडळावर नियुक्ती, महाराष्ट्र राज्य उर्जा खात्याचे प्रधान सचिव, महाराष्ट्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष.
- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, फेब्रुवारी २००९ ते जानेवारी २०१५ या कालावधीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी(महावितरण)चे व्यवस्थापकीय संचालक, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आणि त्यानंतर एप्रिल २०१५ पासून ते मुंबई महापालिकेचे आयुक्त.
- २०१९ मध्ये त्यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- त्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची मुख्यमंत्र्यांनी प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केली. सध्या ते महारेराचे अध्यक्ष आहेत.
(हेही वाचाः मेहतांनंतर आता कुंटे हटाव मोहीम, मुख्यमंत्र्यांबद्दलही राष्ट्रवादीची नाराजी!)
Join Our WhatsApp Community