देशभरात सुरू असलेल्या लसीकरणासाठी सर्व राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आरोग्य मंत्रालयाने या सूचना दिल्या आहेत. लसीकरण मोहिमेसाठी असलेल्या राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने केलेल्या शिफारशींनुसार, या सूचना देण्यात आल्या असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जगभरातील लसीकरणात आढळलेल्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तज्ज्ञ गटाने या सूचना दिल्या असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून त्यांना मान्यता मिळाली आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एक परिपत्रक काढून राज्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
काय आहेत सूचना?
- व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यास, त्यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी त्या व्यक्तीला लस घेता येईल.
- कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थिएरपी किंवा प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपचार सुरू असल्यास, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तीन महिन्यांनी त्या व्यक्तीला लस घेता येईल.
- पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास, त्यातून बरे झाल्यानंतरच तीन महिन्यांनी लसीचा दुसरा डोस घेता येईल.
When should you get vaccinated after recovering from COVID❓
• National Expert Group on Vaccine Admin for COVID-19(NEGVAC) shares fresh recommendations regarding COVID vaccination with @MoHFW_INDIA
• Vaccination to be deferred by 3 months after recovery from the illness pic.twitter.com/sSQV6h5GJz
— Office of Mr. Anurag Thakur (@Anurag_Office) May 19, 2021
- लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी व्यक्तीला रक्तदान करता येईल. तसेच रक्तदानावेळी जाताना आपल्यासोबत लसीकरणाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
- कोविडमुक्त झालेल्या व्यक्तींनी रक्तदानापूर्वी आपला निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्ट सोबत ठेवावा.
- लहान बाळाला स्तनपान करणा-या महिला सुद्धा कोविड प्रतिबंधात्मक लस घेऊ शकतात.
- गरोदर महिलांच्या लसीकरणाचा मुद्दा चर्चेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
- लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींची अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक नाही.
वरील सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश राज्यांनी आपल्या लसीकरण केंद्रांना आणि संबंधित अधिका-यांना द्यावेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community