नाशिक लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) शिवधनुष्य महंत अनिकेत शास्त्री यांनी उचलावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केले आहे. महंत अनिकेत शास्त्री यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
सावरकरांचे कर्तृत्वशाली अनुयायी
रणजित सावरकर म्हणाले की, नाशिक ही प्रभू रामचंद्राची भूमी आहे. इथून राक्षसांचा वध करण्याचे कार्य प्रभू रामचंद्रांनी सुरू केले. नाशिक हनुमानाची जन्मभूमी आहे आणि त्याचप्रमाणे नाशिक हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मक्षेत्र आणि कर्मक्षेत्र आहे. तिथे राजकीय हिंदुत्वाचा उदय झाला. धर्मगुरू अनिकेत शास्त्री हे वीर सावरकर यांच्या राष्ट्रीयत्वाचा आणि हिंदुत्वाच्या विचारांचा जोरदार प्रसार करत असतात. ते वीर सावरकरांचे कर्तृत्वशाली अनुयायी आहेत. त्यांनी आवर्जून राजकारणात उतरावे आणि लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवावी.
विकासकामांसाठी प्रयत्नशील
अनिकेत शास्त्री यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर कॉरिडॉरची मागणी केली आहे. या मागणीचा पाठपुरावा त्यांच्याकडून सुरू आहे. हनुमानाची जन्मभूमी अंजनेरी क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. येथील तीर्थक्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जर ही योजना अंमलात आली, तर स्थानिक जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळून नाशिकचाही विकास होणार आहे. आर्थिक विकासदेखील यातून होऊ शकेल. नाशिकला २०२६ ला कुंभमेळा होणार आहे. त्याकरता जर अशी व्यक्ती खासदार म्हणून निवडून आली, तर जगभरातून येणाऱ्या हिंदू भक्तांनाही या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध होतील, असे रणजित सावरकर म्हणाले. (Lok Sabha Election 2024)
Join Our WhatsApp Community