सध्या जगात काही देशांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. युक्रेन-रशिया यांच्यात युद्ध सुरु असताना हमासमुळे गाझापट्टीत इस्राईलसोबत युद्ध सुरु झाले आहे. त्यातच आता इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करू शकते, अशी शक्यता वॉल स्ट्रिट जर्नलने व्यक्त केली आहे. त्यामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे (Third World War) सावट निर्माण झाले आहे.
इराण आणि इस्रायल दरम्यान तणाव वाढला
इराण आणि इस्रायल दरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. भारतीय नागरिकांनी पुढचे आदेश येईपर्यंत इराण किंवा इस्रायलमध्ये प्रवास करू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच सध्या या दोन देशांत जे भारतीय नागरिक राहत आहेत, त्यांनी तात्काळ तिथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून स्वतःची नोंदणी करावी, असेही म्हटले आहे. इराण आणि इस्रायलचे शत्रूत्व नवे नाही. इस्रायल आणि हमासमध्ये संघर्ष पेटल्यानंतर इराण युद्धात उतरणार, अशी चर्चा होती. मात्र ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबायचे नाव घेत नाही. वॉल स्ट्रिट जर्नलने दिलेल्या बातमीनुसार, इस्रायलवर थेट हल्ला करण्यासंबंधीच्या राजकीय जोखमीचे मूल्यमापन इराणी राज्यकर्ते करत आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर मात्र तिसऱ्या महायुद्धाची (Third World War) ठिणगी पडू शकते.
Join Our WhatsApp Community