तौक्ते वादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने गुजरातचा हवाई दौरा केला आणि १ हजार कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. यामुळे कुणाला वाईट वाटून घेण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी हे देशाचे नेते आहेत, ते महाराष्ट्रालाही १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर करतील, असा आपल्याला विश्वास आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
भविष्यात पंतप्रधानांचे विमान महाराष्ट्राच्या दिशेनेही वळेल!
तौक्ते चक्रीवादळाने जसे गुजरात राज्याचे नुकसान झाले, तसे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचेही खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रकारे गुजरातला १ हजार कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. तशी महाराष्ट्रालाही १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर करतील आणि गोवा राज्यालाही ५०० कोटी रुपये देतील, कारण त्याही राज्याचे नुकसान झाले आहे. त्यात महाराष्ट्राचे नुकसान फार मोठे झाले आहे, असे सांगत आम्हाला खात्री आहे कि भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान महाराष्ट्राच्या दिशेनेही वळेल, असेही संजय राऊत म्हणाले.
(हेही वाचा : सरकार आता वैद्यकीय ‘फौज’ निर्माण करणार!)
देवेंद्र फडणवीसही मदत मागतील!
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या कोकण भागाची पाहणी केली आहे. त्यांचा दौरा पूर्ण झाला आहे, तेही त्यांचा अहवाल बनवून पंतप्रधान मोदी यांना पाठवतील आणि महाराष्ट्रासाठी मदत मागतील, असेही राऊत म्हणाले.
राज्याकडूनही मदत मागितली जाणार!
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. तिथे ते वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. तेही अहवाल बनवून सरकारच्या वतीने केंद्राकडे मदत मागतील, असेही संजय राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community