मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही. गेली २५ वर्ष लोकांसाठी काम केले आहे. जनतेने टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. संघर्ष करणारा व्यक्ती कधी नाराज होत नाही तो आत्मचिंतन करतो. त्यामुळे मी नाराज नाही,असा खुलासा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या मावळत्या खासदार भावना गवळी यांनी शनिवारी वाशिममध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केला. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारात उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या ऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सलग चारवेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या गवळी यांना तिकीट नाकारल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर भावना गवळी यांची नाराजी दूर झाली. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट करताना तिकीट मिळाले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यवतमाळ वाशिम हा शिवसेनेचा गड राहिला असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या याचिकेवर 15 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी)
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४०० पारचा नारा पूर्ण करायचा आहे. तसेच राज्यासाठी अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हात बळकट करण्यासाठी यापुढे पक्षाचे अधिक जोमाने काम करणार आहे. राजश्री पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असतो. शिवसेना पक्षात विद्यार्थीदशेपासून काम करत असून यापुढे काम करत राहणार असल्याचे भावना गवळी यांनी यावेळी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community